आधी रेल्वेचे जाळे मजबूत करा, मगच बुलेट ट्रेन चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 10:23 PM2018-08-02T22:23:55+5:302018-08-02T22:25:33+5:30
रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेचे महासचिव एम. राघवय्या यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेचे महासचिव एम. राघवय्या यांनी केले.
नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले असताना एम. राघवय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१७ मध्ये रेल्वेने देशात १६ हजार कोटी नफा मिळविला. हा नफा म्हणजे १३ लाख १६ हजार कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचे प्रतिक आहे. परंतु शासनाने रेल्वेची संपत्ती विकून विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्याचे धोरण सुरू केले आहे. यात हजारो कामगार काम करीत असलेले कारखाने खासगी कंत्राटदारांच्या हाती सोपविण्यात येत आहेत. स्किल इंडियाच्या नावाखाली केंद्र शासन युवकांमधील स्कील नेस्तनाबूत करण्याचा सपाटा लावत आहे. त्यामुळे शासनाने विदेशी कंपन्यांशी केलेले अॅग्रिमेंट रद्द करावे, रेल्वे कर्मचाºयांमध्ये विदेशी चलन मिळविण्याची शक्ती असून कारखान्यांमधील उत्पादन वाढवून मालाच्या निर्यातीद्वारे विदेशी चलन मिळवावे, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, नवी पेन्शन योजना लागू करूनये, विदेशी कंपन्यांचे कंत्राट रद्द करावे या मागण्यांवर महिनाभरात कारवाई न केल्यास संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. एक दिवस रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केल्यास शासनाला तीन हजार कोटींचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रती गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर, महासचिव डॉ. प्रवीण बाजपेयी, कार्याध्यक्ष डी. भट्टाचार्य, विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव बंडू रंधाई, संघटन सचिव ई. व्ही. राव, युवा संरक्षक अमित भटनागर, सोलापूरचे विभागीय सचिव आर. विश्वनाथ उपस्थित होते.
प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य द्या
रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आठ तास काम करावे असा नियम आहे. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कर्मचारी १२ तासांची ड्युटी करीत आहेत. कंत्राटदारांना कामे दिल्यामुळे ते कामगारांचे शोषण करीत असून कॅटरिंगमध्ये प्रवाशांना दर्जेदार भोजन मिळत नाही. त्यामुळे राजकीय मागण्यांपेक्षा प्रवाशांच्या मागण्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी एम. राघवय्या यांनी केली.