आधी अभ्यास, नंतर अ‍ॅक्शन

By admin | Published: February 28, 2016 03:09 AM2016-02-28T03:09:17+5:302016-02-28T03:09:17+5:30

थोडे थांबा... मला वेळ द्या, जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. गुन्हेगार वगळता प्रत्येकाला सन्मानजनक वागणूक मिळावी,

First study, then action | आधी अभ्यास, नंतर अ‍ॅक्शन

आधी अभ्यास, नंतर अ‍ॅक्शन

Next

पोलीस अधीक्षक अनंत रोकडे : लोकसंवादावर देणार भर
नागपूर : थोडे थांबा... मला वेळ द्या, जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. गुन्हेगार वगळता प्रत्येकाला सन्मानजनक वागणूक मिळावी, यावर आपण प्राधान्याने भर देणार आहोत, अशी प्रतिक्रिया नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी दिली.
२००५ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असलेल्या रोकडे यांनी प्रारंभी गडचिरोली जिल्ह्यात अतिरिक्त अधीक्षक, पुण्यात गुन्हेशाखेला उपायुक्त, दौंडला कमांडंट, परभणीला अधीक्षक आणि लोहमार्ग पोलीस अधीक्षक म्हणून यापूर्वी जबाबदारी सांभाळली. त्यांनी आठ दिवसांपूर्वी नागपूर ग्रामीणच्या अधीक्षकपदाची धुरा हाती घेतली. त्यानंतर आज पत्रकारांशी चर्चा केली. पहिल्याच भेटीत रोकडे यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्याला सरळ उत्तरे देताना, ‘आधी आपण अभ्यास करणार आहोत अन् नंतर अ‍ॅक्शन घेणार’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात बुकींचे जोरदार नेटवर्क असून, पुढ्यात असलेल्या टी - २० सामन्याच्या निमित्ताने शेकडो कोटींची खायवाडी बुकी करणार आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता होय, त्याची माहिती आपण घेत आहोत. बुकींना कसे आवरायचे, त्याचा अ‍ॅक्शन प्लान तयार करीत असल्याचे रोकडे म्हणाले.
नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघाती मृत्यू होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर बोलताना अधीक्षक म्हणाले, वाहतूक शाखेने जिल्ह्यातील अपघाताचे १५६ स्थळ अधोरेखित केले. अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. हेल्मेट सक्ती राबविणार काय, असा प्रश्न आला असता सक्तीपेक्षा जागरुकतेवर आपण भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा- महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून तरुणाईला धोक्याची माहिती द्यायची आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करायची आपली योजना असल्याचे रोकडे यांनी सांगितले. जिल्ह्यात वाळू माफियांचा धुडगूस असल्याची बाब उपस्थित करून वाळू माफियांवर मोक्का लावणार काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता वाळू माफिया, खतरनाक गुन्हेगार यांच्यावर मोक्का लावू. मात्र, त्यात कोणतीही त्रुटी राहणार नाही अन् ते नंतर मोकाट सुटणार नाही, याची आधी आपण तयारी करणार असल्याचे ते म्हणाले.
क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्ताचे आव्हान
८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट (टी-२०) सामन्यांच्या बंदोबस्ताचे आपल्यासमोर मोठे आव्हान असल्याचे रोकडे म्हणाले. जामठा स्टेडियमवर एकूण चार सामने आहेत. सामन्यांच्या तारखा आणि पोलिसांची भरती लागूनच असल्याने जास्त ताण येणार असल्याचे ते म्हणाले. एकूण सामन्यांपैकी १५ आणि २५ मार्चच्या सामन्याचा बंदोबस्त आव्हानात्मक आहे.
सध्याचे वातावरण लक्षात घेता बॉम्बशोधक आणि नाशक पथकासह कडक बंदोबस्त ठेवू, असे ते म्हणाले. सामन्याच्या निमित्ताने होणारी गर्दी, वाहतुकीची समस्या कशी मार्गी लावायची, त्याचे प्लॅनिंग सुरू आहे. त्यासाठी जामठ्याला दोनदा भेटी दिल्या आहेत. मैदानासमोर मोठ्या संख्येत वाहने येतात अन् परत फिरतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. हे लक्षात घेता येणारी वाहने तशीच पुढे काढून हिंगणा वळण मार्गाने मुख्य मार्गाला जोडण्याची योजना आहे.त्यासाठी तीन किलोमीटरच्या मार्गाची डागडुजी करावी लागणार आहे. तसे झाल्यास वाहतुकीची कोंडी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
व्हीसीएकडे पोलिसांची २०१२ पासूनची बंदोबस्ताची मोठी रक्कम थकीत आहे, ती वसूल करण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न होत नसल्याचे लक्षात आणून दिले असता आपण ती माहिती घेत वसुलीची कारवाई करू, असेही अधीक्षक रोकडे म्हणाले.(प्रतिनिधी)

Web Title: First study, then action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.