जिल्हा शल्यचिकित्सक खंडाते यांना अगोदर निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:09 AM2021-01-16T04:09:30+5:302021-01-16T04:09:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी अद्यापही कुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ...

First suspend District Surgeon Khandate | जिल्हा शल्यचिकित्सक खंडाते यांना अगोदर निलंबित करा

जिल्हा शल्यचिकित्सक खंडाते यांना अगोदर निलंबित करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी अद्यापही कुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मागील तीन वर्षांपासून कार्यरत असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी इस्पितळाच्या सुरक्षेसाठी कुठलीच पावले उचलली नाहीत. रुग्णालयाचे ना ‘फायर ऑडिट’ झाले होते, ना तेथे ‘स्मोक डिटेक्टर्स’ होते. सरकारने अगोदर त्यांना निलंबित करावे व त्यानंतर हवी ती चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते गुरुवारी बोलत होते.

सरकारने आता उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र अशा जीवघेण्या घटना घडल्यावरच सरकारला जाग येते आणि मग चौकशांचा ‘फार्स’ केला जातो. प्रत्यक्षात अनेक समित्यांचा तर अहवालच सादर होत नाही, असेदेखील नांदगावकर म्हणाले.

२५ लाखांची मदत आणि नोकरी द्या

मृत बाळांच्या कुटुंबीयांना केवळ नुकसानभरपाई देऊन सरकारची जबाबदारी संपत नाही. दहाही कुटुंबांना कमीत कमी २५ लाखांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली पाहिजे. सरकारकडे बंगल्यांची डागडुजी, फर्निचर, वाहने यांच्यावर खर्च करण्यासाठी कोट्यवधींचा निधी आहे. मग गरिबांना मदत देताना हात अखडता का घेतला जातो, असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला.

सध्या ‘एकला चलो’, भविष्याचे माहीत नाही

बृहन्मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मनसेचे सध्या तरी ‘एकला चलो रे’ असेच धोरण आहे. मात्र मन आणि मतभिन्नता असलेले लोक येऊन सरकार स्थापन करु शकतात हे राज्याने पाहिले आहे. त्यामुळे भविष्यात भूमिका बदलण्यात मनसेला अडचण राहणार नाही, असे सूचक वक्तव्य नांदगावकर यांनी केले.

Web Title: First suspend District Surgeon Khandate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.