आधी विश्वासात घेतले आणि नंतर साडेतेरा लाखांना लुबाडले; ठकबाज महिलेची चलाखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2023 09:26 PM2023-06-06T21:26:30+5:302023-06-06T21:27:08+5:30
Nagpur News एका ठकबाज महिलेने मुंबईहून नागपुरात कामासाठी आलेल्या दांपत्याला विश्वासात घेऊन त्यांच्या कष्टाचा पैसा लुबाडला.
नागपूर : एका ठकबाज महिलेने मुंबईहून नागपुरात कामासाठी आलेल्या दांपत्याला विश्वासात घेऊन त्यांच्या कष्टाचा पैसा लुबाडला. घर विकत घेऊन देण्याच्या बहाण्याने तिने दांपत्याची साडेतेरा लाखांनी फसवणूक केली. महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी तिच्यावर ठोस कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
ऑल्विन डिसुझा (मानकापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऑल्विन हे एका कंपनीत सुपरवायझर आहेत. २०१९ साली त्यांची ओळख सोनिया ऑगस्टिन उर्फ रिटा जॉन ऑगस्टिन (मानकापूर) हिच्याशी एका प्रार्थनास्थळामध्ये ओळख झाली. तिने तिच्या शेजारी असलेल्या फ्लॅट विकायला असल्याचे सांगत ऑल्विनकडून २०२० च्या सुुरुवातीला दोन लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतर लॉकडाऊन लागल्याने सौदा पूर्ण झाला नाही. ऑल्विनने तिला पैसे परत मागितले. तिने कोराडी मार्गावरील घारपांडे यांचे घर विकायचे असल्याची बतावणी केली. तिने ऑल्विनच्या पत्नीला घर दाखविले व कागदपत्रेदेखील दिली.
लॉकडाऊनमुळे रोख रक्कम द्यावे लागेल असे तिने डिसुझा दांपत्याला सांगितले. ऑल्विन यांनी मित्रमंडळींकडून उसने पैसे देऊन वेळोवेळी तिला १३.२६ लाख रुपये दिले. तिने तीन लाखांच्या ॲग्रीमेंटचा कागद आणून दिला. त्यावर घारपांडेंची सही होती, मात्र तिने कधीही त्यांची प्रत्यक्ष भेट घालून दिली नाही. रिटा वारंवार पैसे मागत असल्याने ऑल्विन यांना शंका आली व त्यांनी घारपांडेंकडे चौकशी केली असता त्यांना केवळ ३० हजार रुपये ॲडव्हान्स तिने दिल्याची बाब समोर आली. शिवाय ॲग्रीमेंटवरची सहीदेखील घारपांडेंची नसल्याचे स्पष्ट झाले.
डिसुझा दांपत्याने रिटाला विचारणा केली असता तिने पैसे परत देण्यास नकार दिला व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. रिटाविरोधात मानकापूर पोलीस ठाण्यात डिसुझा यांनी तक्रार दिली व तिच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतरदेखील रिटावर ठोस कारवाई झालेली नाही. कष्टाचा पैसा तिच्या हवाली केला, कमीत कमी शासकीय यंत्रणेने आमच्या हक्काचे पैसे तरी परत मिळवून द्यावे, अशी मागणी डिसुझा दांपत्याकडून करण्यात येत आहे.