१४ वर्षांनंतर प्रथमच नागपूर मनपाच्या बजेटला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:26 PM2020-10-21T12:26:55+5:302020-10-21T12:30:08+5:30
Nagpur Municipal Corporation budget गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रस्तावित अर्थसंकल्प ४६६.६ कोटींनी कमी आहे. मात्र कोविड-१९ मुळे उत्पन्नाला फटका बसला. मागील आठ महिन्यापासून मनपाचे उत्पन्न ठप्प असल्याचे सत्तापक्षाकडून सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत मागील तीन टर्मपासून भाजप सत्तेत आहे. दरवर्षी स्थायी समितीचा अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत वाढीव होता. परंतु सुमारे १४ वर्षांनंतर यावेळी प्रथमच तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी महापालिकेचा सन २०२०-२१ या वर्षांचा २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प मंगळवारी आॅनलाईन विशेष सभेत सादर केला. यात सुुरुवातीची शिल्लक २३१ कोटींची आहे. मागील स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी ३१९७.६० कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प दिला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रस्तावित अर्थसंकल्प ४६६.६ कोटींनी कमी आहे. मात्र कोविड-१९ मुळे उत्पन्नाला फटका बसला. मागील आठ महिन्यापासून मनपाचे उत्पन्न ठप्प असल्याचे सत्तापक्षाकडून सांगण्यात आले.
अर्थसंकल्पाचा विचार करता शिल्लक २३१ कोटी वगळले तर झलके यांचा मूळ अर्थसंकल्प २५०० कोटींचा आहे. वास्तविक तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्ष २०२०-२१ या वषार्चा प्रस्तावित अर्थसंकल्प २६२४ कोटींचा दिला होता. यात ७६.८२ कोटी शिल्लक रक्कम होती. अशा परिस्थितीत शिलक रक्कम वगळता मुंढे यांचा मूळ अर्थसंकल्प हा २५४७.२२ कोटींचा होता. म्हणजेच मुंढे यांच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत झलके यांचा अर्थसंकल्प ४७.२२ कोटींनी कमी आहे.
प्रलंबित कामे पूर्ण करणार -झलके
कोविडमुळे जवळपास आठ महिने वाया गेले. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३४७ कोटींच्या कामांना ब्रेक लावले. तुटीचे नाही तर वास्तवावर आधारित अर्थसंकल्प सादर केला. कोविडमुळे अर्थसंकल्पाला विलंब झाला. मोबाईल रुग्णालय, शवपेटी, गणित उद्यान अशा स्वरुपाचे नवे उपक्रम राबविण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला.
अंमलबजावणीसाठी तीनच महिने-जोशी
तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यासंदर्भात विचारणा करता महापौर संदीप जोशी म्हणाले, सर्वांनी मिळून
अर्थसंकल्प तयार केला आहे. फेब्रुवारीत आयुक्तांचा अर्थसंकल्प येईल. ऑक्टोबर सुरू आहे. अशा परिस्थितीत काम करण्यासाठी तीन महिने शिल्लक आहे. त्यामुळे अर्थसंकल्प फुगवण्यात अर्थ नव्हता. तसेही कोविडमुळे मनपाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.