पहिल्यांदाच ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:01 AM2018-08-07T00:01:33+5:302018-08-07T00:03:15+5:30
अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. नागपुरात अवयवदानासोबतच प्रत्यारोपणाचीही संख्या वाढत आहे. यात मूत्रपिंडासोबत यकृत प्रत्यारोपण होऊ लागले आहे. आतापर्यंत यकृत प्रत्यारोपण हे केवळ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवदानातून व्हायचे. सोमवारी पहिल्यांदाच ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट’ म्हणजे, जिवंत दात्याने दिलेल्या यकृताचे प्रत्यारोपण झाले. यात भावाला त्याच्या छोट्या बहिणीने यकृत दान करून नवे जीवन दिले. विशेष म्हणजे, गरीब मित्रावर ओढवलेल्या या संकटाच्या वेळी मित्र धावून आले. मोठा निधी उभारला. यामुळेच ही शस्त्रक्रिया होऊ शकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. नागपुरात अवयवदानासोबतच प्रत्यारोपणाचीही संख्या वाढत आहे. यात मूत्रपिंडासोबत यकृत प्रत्यारोपण होऊ लागले आहे. आतापर्यंत यकृत प्रत्यारोपण हे केवळ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवदानातून व्हायचे. सोमवारी पहिल्यांदाच ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट’ म्हणजे, जिवंत दात्याने दिलेल्या यकृताचे प्रत्यारोपण झाले. यात भावाला त्याच्या छोट्या बहिणीने यकृत दान करून नवे जीवन दिले. विशेष म्हणजे, गरीब मित्रावर ओढवलेल्या या संकटाच्या वेळी मित्र धावून आले. मोठा निधी उभारला. यामुळेच ही शस्त्रक्रिया होऊ शकली.
प्रणय कुऱ्हाडकर (२४) रा. गोळीबार चौक, नागपूर त्या भावाचे नाव. प्रणयचे वडील नरेश हे एका हॉटेलमध्ये काम करीत होते. परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांच्या हातून हे काम सुटले तर आई माला स्वयंपाकी म्हणून एका हॉटेलमध्ये काम करतात. प्रणय हा मुंजे चौकातील एका कापडाच्या शोरूममध्ये कामाला आहे. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे शोरूममध्ये त्याचे अनेक मित्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती. उपचार सुरू होते. परंतु आजार वाढतच होता. चाचण्या केल्यावर यकृत निकामी झाल्याचे निदान झाले. कुऱ्हाडकर कुटुंब संकटात सापडले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. गरीब कुऱ्हाडकर कुटुंबाला प्रत्यारोपणाला लागणारा निधी उभा करणे शक्य नव्हते. प्रणयची गंभीर अवस्था पाहता डॉक्टरांनी दोन दिवसात प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. ५ आॅगस्ट रोजी याची माहिती त्याच्या मित्रांना मिळाली. त्यांनी एकमेकांना मोबाईलद्वारे माहिती पोहचवून आर्थिक मदतीचे आवाहन केले आणि पाहता पाहता निधी गोळा होऊ लागला. प्रणयला तातडीने लकडगंज येथील ‘न्यू ईरा हॉस्पिटल’मध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी भरती केले. यकृत दानासाठी आई समोर आली. परंतु रक्तगट जुळत नव्हता. भावाचा जीव वाचविण्यासाठी २३ वर्षीय बहीण निकिताने पुढाकार घेतला. प्रत्यारोपणासाठी शासनाच्या ‘अवयव प्रत्यारोपण मंजुरी समिती’ची परवानगी आवश्यक असते. परंतु रविवार, सुटीचा दिवस असल्याने परवानगी मिळणे कठीण होते. डॉक्टर, मित्र व कुटुंब अडचणीत आले. प्रयत्न म्हणून सर्वांनीच मेडिकल गाठले. तिथे काही कामानिमित्त अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आले होते. त्यांना याची माहिती देऊन मदतीची विनंती केली. रुग्णाची गंभीर स्थिती पाहता डॉ. निसवाडे यांनी समितीच्या सदस्यांना बोलवून घेतले. आवश्यक कागदपत्र जमा करण्याच्या अटीवर प्रत्यारोपणाला मंजुरी दिली.
सोमवारी सकाळी न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’ला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत ही शस्त्रक्रिया सुरू होती. हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना त्यांची शस्त्रक्रिया करीत होते. यात हृदय प्रत्यारोपण सर्जन व हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल व कार्डिओलॉजिस्ट डॉ. निधीश मिश्रा यांनीही सहकार्य केले.
न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये आठवे प्रत्यारोपण
मध्यभारतात पहिल्यांदाच ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’ नागपूरच्या न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये सोमवारी झाल्याने अवयवदान चळवळीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सात यकृत प्रत्यारोपण यशस्वी पार पडल्या. परंतु हे सर्व प्रत्यारोपण मेंदूमृत व्यक्तीकडून मिळालेल्या अवयवाचे होते.