नागपुरात पहिल्यांदाच यकृत व मूत्रपिंडाचे एकाचवेळी प्रत्यारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:20 PM2018-08-27T22:20:32+5:302018-08-27T22:28:15+5:30
एकाचवेळी एकाच रुग्णालयात यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण होण्याची नागपुरातील पहिलीच घटना सोमवारी समोर आली. ६४ वर्षीय मेंदू मृत (ब्रेन डेड) वडिलांचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांच्या दोन मुलींनी वेळेत घेतल्याने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. उपराजधानीत अवयवदानाचे महत्त्व रुजत असल्याचे हे चित्र असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाचवेळी एकाच रुग्णालयात यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण होण्याची नागपुरातील पहिलीच घटना सोमवारी समोर आली. ६४ वर्षीय मेंदू मृत (ब्रेन डेड) वडिलांचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांच्या दोन मुलींनी वेळेत घेतल्याने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. उपराजधानीत अवयवदानाचे महत्त्व रुजत असल्याचे हे चित्र असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
विजय बडवाईक (६४) रा. सोनेगाव असे त्या दात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात शर्तीचे उपचार सुरू होते. परंतु उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी शनिवारी ते ब्रेन डेड झाल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना दिली. सोबतच अवयवदान करण्याचा सल्लाही दिला. बडवाईक यांच्या मुली नयना दहातोंडे व पौर्णिमा झोडे यांनी वेळ न घालविता अवयवदानाचा निर्णय घेतला. हॉस्पिटलने झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनात नागपूर झोनल कोआॅर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका महिलेवर यकृत प्रत्यारोपण तर पहिल्यांदाच या हॉस्पिटलमध्ये एका पुरुष रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. राहुल सक्सेना यांनी केली. तर मूत्रपिंड प्रत्यारोपण डॉ. रवी देशमुख, डॉ. एस.जे. आचार्य, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. अनिल सिंग यांनी केली. यांना हृदय प्रत्यारोपण सर्जन डॉ. आनंद संचेती, न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल व कार्डिओलॉजिस्ट डॉ. निधीश मिश्रा यांनी मदत केली. दुसरे मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलमधील पुरुष रुग्णाला देण्यात आले. नेत्रदान माधव नेत्रपेढीला तर त्वचादान आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या रोटरी त्वचा बँकेला देण्यात आले.
पुणे-मुंबईच्या तुलनेत अवयवदानात अजूनही नागपूर मागे असले तरी अवयवदान जनजागृतीचा प्रभाव आता दिसून येत आहे. एकट्या न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये गेल्या चार महिन्यात १० प्रत्यारोपण झाले. तर शहरात या वर्षी हे १२ वे प्रत्यारोपण होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणातही नागपूरने आघाडी घेतली आहे. सोमवारी ६७ व ६८वे प्रत्यारोपण झाले.
मुलींनीच केले अंत्यसंस्कार
वडील गेल्याच्या दु:खातही स्वत:ला सावरत दोन्ही मुली नयना दहातोंडे व पौर्णिमा झोडे यांनी आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. सायंकाळी सहकारनगर घाटावर त्या दोघींनी स्वत: अंत्यसंस्कारही केले. ‘लोकमत’शी बोलताना पौर्णिमा व नयना म्हणाल्या की, वडिलांना सामाजिक कार्याची जाण होती. हयात असताना त्यांनी नेत्रदानाचा अर्जही भरला होता. त्यांच्याच प्रेरणेने अवयवदानाचा निर्णय घेऊ शकलो. वडिलांच्या चौदावीला लागणारा पैसा हा वृद्धाश्रमाला दान म्हणून देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.