एका वर्षानंतर केला पहिला ट्विट अन बनले ‘चौकीदार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:05 AM2019-03-20T10:05:19+5:302019-03-20T10:09:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला चौकीदार म्हटल्यानंतर ‘चौकीदार’ हा शब्द लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग झाला आहे.
फहीम खान।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला चौकीदार म्हटल्यानंतर ‘चौकीदार’ हा शब्द लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग झाला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपले ट्विटर अकाऊंट चौकीदार नावाने सुरू केले आहे. नागपूर लोकसभा क्षेत्रातही भाजपाच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटमध्ये चौकीदार शब्द जोडला आहे. परंतु यात काही असेही आहे, जे ट्विटवर कधीही अॅक्टिव्ह नव्हते, पण चौकीदार शब्दाचा प्रचार होत असल्याने देखाव्यासाठी ते चौकीदार बनले.
महापौर नंदा जिचकार यांचे ट्विटर अकाऊंट मार्च २०१० रोजी बनले आहे. परंतु नऊ वर्षात त्यांनी केवळ ११ ट्विट केले आहे. यातही २०१० मध्ये केवळ तीन ट्विट केले. २०१७ मध्ये दोन व २०१८ मध्ये पाच ट्विट केले. २०१८ नंतर त्यांचा ट्विट १७ मार्च २०१९ ला आला आणि त्या ट्विटवर ‘चौकीदार’ बनल्या. यापूर्वी महापौर म्हणून ट्विटवर अॅक्टिव्ह राहण्याची गरज त्यांना वाटली नाही. परंतु ‘चौकीदार’ बनण्यासाठी त्या एक वर्षानंतर अॅक्टिव्ह झाल्या. भारतीय जनता पक्षाच्या ‘चौकीदार’ कॅम्पेनमध्ये नागपुरातील भाजपाची नेतेमंडळी जुळली आहे. परंतु १९ मार्चपर्यंत नागपुरातील भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. विकास महात्मे तसेच आमदार डॉ. मिलिंद माने व आमदार सुधाकर देशमुख यांनी कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला नाही. विकास महात्मे जून २०१६ पासून ट्विटवर आहे. आतापर्यंत त्यांनी १३ ट्विट केले आहे. परंतु ११ नोव्हेंबर २०१६ पासून एकही ट्विट केले नाही. मात्र डॉ. माने यांनी अजूनही ट्विटर अॅक्टिव्ह केलेले नाही. आ. सुधाकर देशमुख हे जून २०१७ पासून ट्विटरवर आहे. आतापर्यंत त्यांनी ४९५ ट्विट केले आहे.
हे बनले ‘चौकीदार’
ट्विटरवर आपल्या अकाऊंटशी ‘चौकीदार’ जोडण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह अनेक नेते ‘चौकीदार’ बनले आहेत.