नागपूर जिल्ह्यातील दुधाळा येथे पहिल्यांदाच भरला आठवडी बाजार; १५ कि.मी.ची पायपीट थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:14 PM2017-11-29T15:14:56+5:302017-11-29T15:17:52+5:30
साधारणत: ११०० लोकसंख्या असलेल्या दुधाळा (ता. मौदा) येथे आठवडी बाजार भरत ग्रामस्थांना पायपीट करीत रामटेक, नगरधन, चाचेर, मौदा, कन्हान येथे जावे लागत होते. परिणामी अख्खा दिवसच नागरिकांचा वाया जात होता. यावर विचारमंथन होऊन आठवडी बाजार भरविण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार दुधाळा येथे पहिल्यांदाच आठवडी बाजार भरला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : साधारणत: ११०० लोकसंख्या असलेल्या दुधाळा (ता. मौदा) येथे आठवडी बाजार भरत ग्रामस्थांना पायपीट करीत रामटेक, नगरधन, चाचेर, मौदा, कन्हान येथे जावे लागत होते. तेथून भाजीपाला, किरकोळ वस्तू आणाव्या लागत. सकाळी निघालेली व्यक्ती सरळ रात्रीच घरी पोहोचत असे. परिणामी अख्खा दिवसच नागरिकांचा वाया जात होता. ही बाब लक्षात घेता गावातच आठवडी बाजार भरला तर नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होऊ शकते, यावर विचारमंथन होऊन आठवडी बाजार भरविण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार दुधाळा येथे पहिल्यांदाच आठवडी बाजार भरला. आता गावातच आठवडी बाजार भरणार असल्याने ग्रामस्थांची पायपीट थांबली असून नागरिकांना दिलासा मिळाला.
दुधाळा या गावातील नागरिकांना कोणतेही काम करायचे असल्यास नागरिकांना १० ते १५ किमी अंतर पायपीट करावी लागते. त्यातच भाजीपाला किंवा अन्य किरकोळ खरेदी म्हटले की नागरिकांना त्रासदायक होते. ही बाब लक्षात घेता सरपंच सूर्यकांत चिंचुलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण उमाळे, सक्षोधन कळंबे, उपसरपंच उमेश झलके यांनी गावात आठवडी बाजार भरविण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार आठवडी बाजार भरविण्यावर एकमत होऊन शुक्रवारी (दि. २४) आठवडी बाजार भरविला.
यानिमित्त भाजीपाला विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांचे सरपंच चिंचुलकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
हा बाजार आता दर शुक्रवारी दुधाळा येथे भरणार आहे. त्यामुळे नागरिकांना गावातच भाजीपाला आणि अन्य किरकोळ साधने खरेदी करता येणार असून पायपीट थांबली. या बाजाराचा दुधाळ्यासह हिंगणा, नेरला, नंदापुरी, हातोडी, गांगनेर, खेडी, चोखाळा, किरणापूर, खोपडी, बारशी, चाचेर, नवेगा येथीलही नागरिकांना फायदा होणार आहे.