देशातील पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन गडचिरोलीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 10:45 AM2023-04-15T10:45:53+5:302023-04-15T10:49:02+5:30

आजपासून जागर : दोन दिवस होणार वैचारिक मंथन

First Tribal Women's Literary Conference in Gadchiroli from 15-16 april | देशातील पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन गडचिरोलीत

देशातील पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन गडचिरोलीत

googlenewsNext

नागपूर : आदिवासी महिलासाहित्य संमेलन १५ एप्रिलपासून गडचिरोलीत सुरू होणार आहे. देशातील हे पहिलेच आदिवासी महिलासाहित्य संमेलन आहे. त्यात देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाच्या संयोजक, साहित्यिक कुसूमताई अलाम (गडचिरोली) यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आदिवासी विभागाचे उपायुक्त दशरथ कुळमेथे, लता मडावी, मधू राघवेंद्र (आसाम) उपस्थित होते.

१५ आणि १६ असे दोन दिवस गडचिरोलीच्या (धानोरा मार्ग) महाराजा लॉनमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडी आणि रॅलीने होणार आहे. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन नजुबाई गावित (धुळे) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. स्ट्रीमलेट डखार (मेघालय) तर, प्रमुख अतिथी म्हणून स्वागताध्यक्ष, माजी आमदार हिरामन वरखेडे राहणार आहेत.

संमेलनाला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खा. अशोक नेते, राजेंद्र गावित, आ. विजय वडेट्टीवार, अभिजित वंजारी, माजी मंत्री मधुकर पिचड, धर्मरावबाबा आत्राम, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री उषाकिरण आत्राम यांच्यासह आदिवासी समाजातील अनेक मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आदिवासी महिला साहित्य संमेलन कृती समितीच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतिवीर नारायणसिंह उईके आदिवासी विकास समिती, आदिवासी एकता परिषद, फेडरेशन ऑफ इंडियन इंडिजिनिअस लँग्वेज, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, जन अधिकार मंच, गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामसभा या संमेलनाच्या निमंत्रक आहेत. साहित्य, शिक्षण आणि आदिवासी महिलांच्या स्थितीसोबतच या संमेलनात आदिवासी संस्कृती, त्यांची बोलीभाषा, जीवनपद्धत, परंपरा, आरोग्य यावर वैचारिक मंथन होणार असल्याचेही यावेळी कुसूमताई अलाम यांनी सांगितले.

Web Title: First Tribal Women's Literary Conference in Gadchiroli from 15-16 april

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.