सतरंजीपुऱ्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त : मेडिकलने टाळ्या वाजवून दिला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 09:31 PM2020-04-24T21:31:39+5:302020-04-24T22:58:41+5:30

सतरंजीपुऱ्यातील मृताकडून लागण झालेले रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. शुक्रवारी मृताचा मुलगा, मुलगी व त्यांच्या कुटुंबातील सात रुग्ण मेडिकलमधून कोरोनामुक्त होऊन घरी गेले.

The first two patients from Sataranjipur were cured | सतरंजीपुऱ्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त : मेडिकलने टाळ्या वाजवून दिला निरोप

सतरंजीपुऱ्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त : मेडिकलने टाळ्या वाजवून दिला निरोप

Next
ठळक मुद्देबरे झालेल्या रुग्णांची संख्या २२

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सतरंजीपुऱ्यातील मृताकडून लागण झालेले रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. शुक्रवारी मृताचा मुलगा, मुलगी व त्यांच्या कुटुंबातील सात रुग्ण मेडिकलमधून कोरोनामुक्त होऊन घरी गेले. एकीकडे नागपुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने शंभरी गाठली असताना सात रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २२ झाली आहे.  सतरंजीपुऱ्यातील ६८ वर्षीय मृताचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह येताच खळबळ उडाली. कोरोनाबाधित मृताकडून आतापर्यंत ६० च्यावर लोकांना संसर्ग झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या २०० वर संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले. मृताचे नमुने पॉझिटिव्ह येताच ७ एप्रिल रोजी मुलगा, तीन मुलीसह जवळच्या कुटुंबाना क्वारंटाईन केले. ९ एप्रिल रोजी सहा रुग्णाचे तर १० एप्रिल रोजी एका नातेवाईकाचा नमुना पॉझिटिव्ह आला. या सर्वांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. ७ व्या दिवशी आणि १४ व्या दिवशी २४ तासांच्या अंतराने नमुने तपासले असता सर्वांचे तिन्ही नमुने निगेटिव्ह आले. यामुळे शुक्रवारी सायंकाळी ३५ वर्षीय महिला व ३० वषीय पुरुषाला तर रात्री ८ वाजताच्या सुमारास २२, ३४ व ४२ वर्षीय महिलेला आणि १४ वर्षीय मुलासह ४२ वर्षीय पुरुष अशा पाच जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या सर्वांनी मेडिकलच्या सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी व मेट्रन मालती डोंगरे यांनी कोव्हीड वॉर्डात सेवा देणाऱ्यांचे कौतुक केले. 
सात महिन्याचे बाळही कोरोनामुक्त
 कोरोना पॉझिटिव्ह आईवडिलांपासून सात महिन्याच्या बाळाला संसर्ग होऊ न देण्याचे आवाहन त्याच्या आईवडिलांपासून ते डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांवर होते. या सर्वांनी त्या दृष्टीने परिश्रम घेतले. यामुळे १४ व्या दिवसानंतर आईवडिलांचे नमुने निगेटिव्ह आल्याने हे बाळही कोरोनामुक्त राहूनच घरी जाऊ शकले. मेडिकलच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
या डॉक्टरांच्या सेवेला सलाम
'कोव्हीड-१९’ वॉर्डातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या सेवेत मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांच्यासह डॉ. पंकज घोलप, डॉ. अर्चना अहेर, डॉ.सागर खंडारे, डॉ. प्रति नामजोशी, डॉ. अमृता कडबे, डॉ. मुकुंद उपाध्याय, डॉ. दीपांशू आसुदानी, डॉ. अनंता नरवाडे, डॉ. आदित्य मोरे आदी परिश्रम घेत आहेत. 

Web Title: The first two patients from Sataranjipur were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.