नरभक्षी वाघिणीने केली पहिली शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:02 AM2017-08-11T02:02:13+5:302017-08-11T02:42:17+5:30
नरभक्षी वाघिणीने दोन दिवस कावडीमेट परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच या वाघिणीने पुसागोंदी शिवारात एका वासराची शिकार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढाळी : नरभक्षी वाघिणीने दोन दिवस कावडीमेट परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच या वाघिणीने पुसागोंदी शिवारात एका वासराची शिकार केली. नरभक्षी वाघिणीला बोर व्याघ्र प्रकल्पात सोडल्यानंतरची शिकारीची ही पहिली घटना आहे. आधीच नरभक्षी वाघिणीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना वासराच्या शिकारीमुळे पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. या वाघिणीला बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यासही नागरिकांनी सुरुवातीला विरोध केला होता. मात्र विरोधानंतरही वाघिणीला तेथेच सोडण्यात आले. त्यात ही घटना घडली. दरम्यान, वाघिणीच्या संरक्षणासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स आणि वन विभागाचे ४० जवान कावडीमेट परिसरात दाखल झालेले आहेत.
ब्रह्मपुरी परिसरात धुमाकूळ घालून अनेक नागरिकांवर हल्ला करून त्यांना ठार करणाºया नरभक्षी वाघिणीला अलीकडे बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. या वाघिणीने सुरुवातीला अडेगाव परिसरात मुक्काम ठोकला होता. त्यामुळे या परिसरातील अडेगाव, कवडस, गोठणगाव, देवळी, पेंढरी, खापा बोरी, गिदमगड, काजळी, धोकुर्डा, बारंगा, सावळी (बिबी), चौकी, डेगमा, माथनी, नवेगाव, वानरविहिरा आदी गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नरभक्षी वाघिण बोरमध्ये सोडण्यास नागरिकांनी विरोध केला होता. त्यानंतरही वाघिणीला तेथेच सोडण्यात आले. दरम्यान मंगळवारी (दि. ८) या नरभक्षी वाघिणीने अडेगाव जंगलालगत एका शेतात ठिय्या मांडला. या परिसरातील शेतात कामाला जाणाºया मजुरांना ही वाघिण दिसताच त्यांनी पळ काढला. बराच वेळ ती वाघिण एकाच जागेवर बसून होती.
आलेसूरमध्ये पुन्हा एका गाईची शिकार
नांद : आलेसूर शिवारात आणखी एका गाईवर वाघाने हल्ला चढवून ठार केले. हा प्रकार गुरुवारी (दि. १०) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. आठवडाभरात वाघाने चार गार्इंची शिकार केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सूर्यभान खाटे, रा. आलेसूर असे नुकसानग्रस्ताचे नाव आहे. गुराखी रमेश गुळधे हा गुरुवारी सकाळच्या सुमारास गाई चराईसाठी घेऊन गेला होता. गावातील शाळेलगत तो गाई चारत असताना वाघाने एका गाईवर हल्ला केला. हा प्रकार लक्षात येताच त्याने आरडाओरड केली, नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत वाघ जंगलात पळून गेला तर गाईचा मृत्यू झाला होता. याबाबत वन कर्मचाºयाला सूचना दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला.चार दिवसांपूर्वी वाघाने तीन जनावरांवर हल्ला करून ठार केले. आता पुन्हा त्यात एकाची भर पडली.
शेतात एकटे जाऊ नये
सध्या शेतीची कामे सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांना शेत कामासाठी शेतात जावेच लागते. त्यातच वन्य प्राणी हे रात्रीच्या वेळी पिकांचे नुकसान करीत असल्याने रखवालीसाठीसुद्धा शेतकºयांना जावे लागते. मात्र ही नरभक्षी वाघिण येताच शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दुसरीकडे वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आली असून कावडीमेट, किनकीडोडा गावातील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. ही वाघिण काही दिवस परिसरात थांबून बोर व्याघ्र प्रकल्पात निघून जाईल. त्यामुळे शेतकºयांनी सध्यातरी एकटे शेतात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. या वाघिणीने याच भागात आणखी काही दिवस मुक्काम केला तर तो चिंतेचा विषय होईल. त्यानंतर बेशुद्ध करून त्या वाघिणीला पकडण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे वन विभागाच्या एका अधिकाºयाने सांगितले.