नागपुरात कोरोनाचा पहिला बळी; आठवड्यात कोरोनाचे २७ रुग्ण पॉझिटिव्ह
By सुमेध वाघमार | Published: January 6, 2024 09:14 PM2024-01-06T21:14:57+5:302024-01-06T21:15:24+5:30
मनपाच्या मंगळवारी झोनमधील मानकापूर येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्ण मागील काही दिवसांपासून एका खासगी हॉस्पिटल भरती होते.
नागपूर : कोरोना ‘जेएन.१ व्हेरियंट’चा २०रुग्णांची नोंद शुक्रवारी झाली असताना शनिवारी एका ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यूने खळबळ उडाली. या वर्षातील हा पहिला मृत्यू आहे. या आठवड्यात कोरोनाचे २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, ४२ रुग्ण ‘अॅक्टीव्ह’ आहेत.
मनपाच्या मंगळवारी झोनमधील मानकापूर येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्ण मागील काही दिवसांपासून एका खासगी हॉस्पिटल भरती होते. त्यांना गंभीर स्वरुपातील हृद्यविकार होता. नुकतेच त्यांची ‘बायपास सर्जरी’ झाली होती. त्यांना ‘पेसमेकर’ही लावण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची कोरोना तपासणी केली असता ती ‘पॉझिटिव्ह’ आली. शनिवारी त्यांचा मृत्यूची नोंद राज्याचा ‘कोवीड प्रेसनोट’मध्ये घेण्यात आली. आज शहरात आठ तर ग्रामीणमध्ये एक असे नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
रुग्णाचा मृत्यूचे ‘आॅडीट’ करणार
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या ८२वर्षीय इसमाचा मृत्यूचे लवकरच ‘आॅडीट’ केले जाईल. त्यांना ‘क्रॉनिक हार्ट डिसीज’ हाता. त्यामुळे हा मृत्यू कोरोनामुळे झाला की गंभीर हृद्यविकारामुळे ते स्पष्ट होईल. कोरोनाला घाबरून न जाता काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.