पहिले वारकरी विद्यापीठ श्री क्षेत्र धापेवाड्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:07 AM2019-09-21T11:07:49+5:302019-09-21T11:09:13+5:30

वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार मुलांना आध्यात्मिक व सुसंस्कारीत शिक्षण देण्याच्या उद्देशाने वारकरी विद्यापीठ स्थापन करण्याचा संकल्प विश्व वारकरी सेवा संस्थेने केला आहे.

First to Warkari University at Dhapewada | पहिले वारकरी विद्यापीठ श्री क्षेत्र धापेवाड्याला

पहिले वारकरी विद्यापीठ श्री क्षेत्र धापेवाड्याला

Next
ठळक मुद्देविश्व वारकरी सेवा संस्थेचा संकल्प देश व देशाबाहेरही विद्यालये सुरू करण्याचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार मुलांना आध्यात्मिक व सुसंस्कारीत शिक्षण देण्याच्या उद्देशाने वारकरी विद्यापीठ स्थापन करण्याचा संकल्प विश्व वारकरी सेवा संस्थेने केला आहे. या संकल्पाप्रमाणे विदर्भाचे पंढरपूर संबोधले जाणाऱ्या श्री क्षेत्र धापेवाडा येथे पहिले वारकारी विश्वविद्यालय स्थापण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप जिवलग कोहळे यांनी याबाबत माहिती दिली. संस्थेतर्फे वारकरी विद्यापीठाची स्थापना करून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात, तालुक्यात तसेच भारत व भारताबाहेरही काही शहरात शालेय/महाविद्यालयीन शिक्षणासोबत वारकरी शिक्षण देणारी विद्यालये सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. धापेवाडा येथील विद्यापीठ हे निवासी स्वरुपाचे राहणार असून अनाथ व निराधार मुलांना मोफत शिक्षण आणि सर्व प्रकारच्या मुलांना नि:शुल्क वारकरी शिक्षण देण्यात येणार असल्याचे कोहळे यांनी सांगितले. तसेच संस्थेद्वारे संचालित पहिले वारकरी शिक्षण केंद्र , श्री स्वामी समर्थ मंदिर, स्वामी धाम बेसा येथे सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जगभरात वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी संस्थेची स्थापना झाली असून या माध्यमातून आध्यात्मिक चळवळ सुरू करण्याचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. विद्यापीठासह वारकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व संप्रदायातील विविध संस्थांना एकत्रित करून मोठ्या प्रमाणात सेवा प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
इंटरनेट पोर्टलच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आणून सर्व महाराज, कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, वीणेकरी यांची इंटरनेटवर फोटोसहित माहिती इंटरनेटवर प्रकाशित करण्यात येईल. याशिवाय राज्यातील प्रमुख विठ्ठल रुखमाई मंदिर, वारकरी संतांची मंदिरे आणि वारकरी भजन मंडळांचीही माहिती या पोर्टलवर प्रकाशित करण्यात येणार असल्याचे कोहळे यांनी स्पष्ट केले. या सर्व उपक्रमांसाठी समर्पित सेवक व वारकरी संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उमेश्वर महाराज बारापात्रे, सचिव हभप संदीप ठाकरे, कोषाध्यक्ष विलास जिल्हारे, विश्वस्त दिनकर कडू, नामदेव राऊत, जिवलग कोहळे यांनी केले आहे.

Web Title: First to Warkari University at Dhapewada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.