कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५१ वर्षांपुढील २४५८ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:06 AM2020-12-07T04:06:33+5:302020-12-07T04:06:33+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५१ वर्षांपुढील वयोगटातील रुग्णांचे सर्वाधिक, ७७ टक्के मृत्यू झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ...
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५१ वर्षांपुढील वयोगटातील रुग्णांचे सर्वाधिक, ७७ टक्के मृत्यू झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यापर्यंत झालेल्या एकूण ३१६४ मृतांमध्ये या वयोगटात २४५८ मृत्यूची नोंद आहे. यात शहरातील २०१२ तर ग्रामीणमधील ४४६ मृतांचा समावेश आहे. यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या वयोटातील लोकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद एप्रिल महिन्यात झाली. जुलै महिन्यापर्यंत मृत्यूची संख्या कमी होती. ऑगस्ट महिन्यापासून रुग्णसंख्येसोबतच मृतांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. या महिन्यात ९१९, सप्टेंबर महिन्यात याच्या दुप्पट १४०६ तर ऑक्टोबर महिन्यात यात घट येऊन ९५२ मृत्यू नोंदविल्या गेले. नोव्हेंबर महिन्यात ही संख्या आणखी कमी झाली. २६९ मृत्यूची नोंद झाली. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात मृतांच्या संख्येत २८.२५ टक्क्याने घट आली. नोव्हेंबरपर्यंत नोंद झालेल्या ३१६४ मृतांमध्ये
-शहरात १४२६ तर ग्रामीणमध्ये ३२१ पुरुषांचे मृत्यू
५१ वर्षांवरील मृत्यूची संख्या ग्रामीणच्या तुलनेत शहरात जास्त आहे. शहरात १४२६ पुरुष, ५८६ महिला तर ग्रामीणमध्ये ३२१ पुरुष व १२५ महिलांचा मृत्यू झाले आहेत. या वयोगटात रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह व इतर सहव्याधी अनेकांना राहतात. यामुळे कोरोनावरील उपचारास योग्य प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला आहे.
-३१ ते ५० वयोगटात ४२५ पुरुष
३१ ते ५० वयोगटात कोरोनामुळे ६०० मृत्यू झाले आहेत. यात शहरातील ४५२ तर ग्रामीणमधील १४८ रुग्णांचे मृत्यू आहेत. यात पुरुषांची संख्या ४२५ तर महिलांची संख्या १७५ आहे.
-१६ ते ३० वयोगटात
१६ ते ३० वयोगटात ९४ बळी गेले आहेत. यात शहरातील ६६ तर ग्रामीणमधील २८ मृत्यू आहेत. यात पुरुषांची संख्या ५४ तर महिलांची संख्या ४० आहे. ० ते १५ वयोगटात १२ मृत्यूची नोंद आहे.
-वयोगटानुसार मृत्यू
० ते १५ वयोगट-१२
१६ ते ३० वयोगट-९४
३१ ते ५० वयोगट-६००
५१ व पुढील वयोगट-२४५८