नागपुरात गोरेवाडा तलावावर देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:29 AM2018-06-20T11:29:01+5:302018-06-20T11:29:08+5:30
पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन तेथून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणाऱ्या विद्युत खर्चात बचत व्हावी या हेतूने हा प्रकल्पासाठी लागणारी वीज सोलरमधून मिळावी, असा प्रस्ताव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन तेथून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणाऱ्या विद्युत खर्चात बचत व्हावी या हेतूने हा प्रकल्पासाठी लागणारी वीज सोलरमधून मिळावी, असा प्रस्ताव आहे. जागेच्या अभावामुळे हा सोलर प्रकल्प तलावातच उभारण्याचा विचार असून देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प म्हणून तो ओळखला जाईल.
पॉवरग्रीडच्या संचालक आणि अधिकाऱ्यांची मंगळवारी महापालिकेच्या मुख्यालयात बैठक झाली. तीत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, उपअभियंता दीपक चिटणीस, पॉवरग्रीडचे कार्यकारी संचालक संजय गर्ग, व्यवस्थापक अनुराग श्रीवास्तव, उपव्यवस्थापक डॉ. विनय सेनरे उपस्थित होते. गोरेवाडा तलावावर तीन मेगावॅट ‘फ्लोटिंग सोलर’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पॉवरग्रीडने नागपूर महापालिकेसमोर ठेवला आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत, मनपा किती रक्कम या प्रकल्पात गुंतवेल, गुंतवणुकीसाठी किती निधी उपलब्ध करण्यात येईल, प्रकल्पाचा खर्च किती वर्षात निघेल आणि किती वर्ष मोफत वीज सोलरच्या माध्यमातून मिळेल, याबाबत संपूर्ण माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून पॉवरग्रीडच्या अधिकाऱ्यांनी दिली. याबाबतच्या सर्व शक्यता तपासून प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांना दिले.