विधी विद्यापीठाची पहिल्या वर्षी घोडदौड
By admin | Published: February 13, 2017 02:32 AM2017-02-13T02:32:06+5:302017-02-13T02:32:06+5:30
नागपुरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
‘एलएलबी’च्या सर्व जागा ‘हाऊसफुल्ल’
नागपूर : नागपुरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यंदा ‘एलएलबी’च्या सर्व जागा तर ‘हाऊसफुल्ल’ झाल्या. शिवाय मंजूर पदांची भरतीदेखील सुरू झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासंदर्भात विचारणा केली होती. पहिल्या वर्षी किती जागा भरल्या, शुल्क कसे ठरविण्यात आले तसेच पदभरतीची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.न.म.साकरकर यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार पहिल्या वर्षी ‘बीएएलएलबी’साठी प्रवेशसंख्या ६० इतकी होती. सर्व जागांवर प्रवेश झाले. शिवाय ‘एलएलएम’ अभ्यासक्रमासाठी ६ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. विद्यापीठासाठी राज्य शासनाने ४२ पदांचा मंजूर दिली होती. यापैकी १३ पदांवर भरती झालेली आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत शासनाने विद्यापीठाला ३ कोटी ३ लाख ८९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत यातील २ कोटी ४८ लाख ७ हजार ४३६ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.(प्रतिनिधी)
शुल्क नियमांनुसारच
विद्यापीठाच्या शुल्कासंदर्भात प्रशासनाने स्पष्टोक्ती केली आहे. चालू वर्षाचे शुल्क ठरविण्यासाठी कोणतीही नियमन समिती नेमण्यात आली नव्हती. इतर राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शुल्काच्या प्रमाणातच शुल्क ठरविण्यात आले. कार्यकारी परिषद व विद्वत् परिषदेने शुल्क मान्य केले होते, असे विद्यापीठातर्फे माहितीत नमूद करण्यात आले आहे.