महादुल्यातील मच्छी मार्केट हाेणार स्थानांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:40 AM2021-02-05T04:40:52+5:302021-02-05T04:40:52+5:30
काेराडी : महादुला येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मटण-मच्छी मार्केटच्या स्थानांतरणाचा मुद्दा सुटण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. काही ...
काेराडी : महादुला येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मटण-मच्छी मार्केटच्या स्थानांतरणाचा मुद्दा सुटण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. काही दिवसांतच हे मार्केट आठवडी बाजारात विशिष्ट ठिकाणी स्थानांतरित केले जाणार आहे. या संदर्भात मटण व मच्छी विक्रेत्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना साेईस्कर ठिकाणी वसविण्यासाठी नगराध्यक्ष राजेश रंगारी व मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे यांनी मांस विक्रेत्यांशी चर्चा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे.
महादुला येथे कोराडी मंदिर टी-पॉइंट परिसरात मटण विक्रीची दुकाने आहेत. महामार्गालगतची मांस विक्रेत्यांची दुकाने स्थानांतरित करून त्यांना विशिष्ट ठिकाणी मार्केट म्हणून जागा उपलब्ध करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. महामार्गाच्या विस्तारानंतर रस्त्यावर भरणारा बाजार, आठवडी बाजार नगरपंचायतीने स्वतःच्या जागेत स्थानांतरित केला. मटण, मच्छी मार्केट मात्र स्थानांतरित झाले नव्हते. त्यामुळे ही मागणी प्रलंबित होती. यापूर्वी मांस विक्रेत्यांना दिलेली जागा बाजाराच्या दृष्टिकोनातून सोयीचे नसल्याने त्या ठिकाणी त्यांची जाण्याची इच्छा नव्हती. नगर पंचायतीने आठवडी बाजाराच्या ठिकाणी त्यांना जागा देण्याचे आता मान्य केले आहे. त्यानुसार आठवडी बाजाराच्या जागेत शहरालगत असलेली जागा मटण व मच्छी विक्रेत्यांना देण्याचे मान्य करण्यात आले. मांस विक्रेत्यांसाठी कायमस्वरूपी शेड बांधून देण्यात येणार आहे. तत्पूर्वी शहरालगत शेड उभारणीपर्यंत तात्पुरती व्यवस्था करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रत्येक नियमित दुकानदाराला १० बाय २० जागा नगरपंचायत उपलब्ध होईल. तेथे पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची विल्हेवाट विशिष्ट पद्धतीने लावली जाईल. तशी व्यवस्था नगर पंचायत करून देणार आहे. या ठिकाणी नियमित मटण विक्रेते तसेच आठवडी बाजारात येणारे मच्छी विक्रेत्यांना विशिष्ट जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत सर्व मांस विक्रेते आठवडी बाजारात स्थानांतरित होतील, अशी अपेक्षा नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी व्यक्त केली.