ढिवर समाजावर उपासमारीची पाळी; शासनाकडून मदत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:58 PM2020-04-17T17:58:32+5:302020-04-17T17:58:57+5:30
जीव मुठीत धरून परंपरागत व्यवसाय करत असलेल्या कामठी तालुक्यातील ढिवर समाजावर सध्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. गत महिनाभरापासून तालुक्यातील मच्छीमारीचा व्यवसाय बंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जीव मुठीत धरून परंपरागत व्यवसाय करत असलेल्या कामठी तालुक्यातील ढिवर समाजावर सध्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. गत महिनाभरापासून तालुक्यातील मच्छीमारीचा व्यवसाय बंद आहे.
कामठी तालुक्यातून कोलार व कन्हान या नद्या वाहत असून या नदीकाठाने बीना, वारेगाव, सुरदेवी, गादा, आजनी, नेरी, ऊनगाव, असलवाडा, भूगाव, परसाड, पवणगाव, सोनेगाव राजा, चिकना, कढोली, माथनी, झुल्लर, गुमथळा गावात ढिवर समाजाची ६०० कुटुंबे गत तीन पिढ्यांपासून वास्तव्यास आहेत. कन्हान व कोलार नदीतून मच्छीमारीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून वास्तव्य करीत आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे या मच्छीमारांचा रोजगार हिरावला गेला. घरातील असलेले अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू संपल्यामुळे ढिवर समाजातील नागरिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.
तालुक्यातील गादा येथील गोविंदा डायरे (६५) व मनोहर भोयर (६०) यांनी लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यथा मांडली. मच्छी विक्रीतून होणारी रोजची २५० ते ५०० रुपयांची मिळकत थांबली असल्याची ते म्हणाले. इकडे या समाजातील गरजूंना अन्नधान्य व जीवनवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याची मागणी अंबादास भोयर, कैलास शेंडे, बाळू भोयर, अजित डायरे, सुत्तम सोनवणे, बबन गोडाळे , श्रीपाद टोहिणे, बबन शिंदे, सुरादेवीचे सरपंच सुनील दुधपचारे, बंडू बावणे, निरंजन केवट यांच्यासह अनेक समाजबांधवांनी केली आहे.