मत्स्यव्यवसाय विकास आराखडा लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:27 AM2017-09-08T01:27:26+5:302017-09-08T01:28:01+5:30
विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा कुलगुरूंचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा कुलगुरूंचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या अनुषंगाने विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकासाचा कृती आराखडा, अहवाल लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास विदर्भ विकास मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
विदर्भ विकास मंडळाचे सन २०१७-१८ या वित्तीय वर्षातील दुसरी नियमित बैठक गुरुवारी विदर्भ विकास मंडळाच्या सभागृहात अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य अॅड. मधुकरराव किंमतकर, डॉ. कपिल चांद्र्रायण, डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. किशोर मोघे तसेच विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव तथा अपर आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहसंचालक अरविंद देशमुख, उपायुक्त नियोजन बी. एस. घाटे, प्रशासकीय अधिकारी मेघा इंगळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय विकासाच्या या अहवालाची सद्यस्थिती जाणून घेऊन पुढील नियोजन व संबंधित कार्यवाही करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान संपूर्ण नागपूर विभागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सन २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय अभियान स्वरूपात राबविण्याची गरज आहे. यासाठी मत्स्यव्यवसायाच्या धर्तीवर चारा उत्पादनास प्रोत्साहन, दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढीपालन, रेशीम तसेच हस्तकला उद्योग अशा शेतीपूरक व्यवसायावर आधारित अभियान राबविण्यास भर देण्यात येईल, असे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यावेळी सांगितले.
‘स्टडी आॅन डेव्हलपिंग ग्रोथ स्ट्रॅटेजी फॉर विदर्भ’ हा अभ्यास अहवाल तयार करण्याकरिता आवश्यक असलेल्या माहितीसाठी अकोला, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ व वाशीम येथे गठित करण्यात आलेल्या उपसमितीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठका पार पडल्या आहेत.
उर्वरित जिल्ह्यातील बैठका लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सदस्य सचिव तथा अपर आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी यावेळी दिली. मानव विकास केंद्र, यशदा, पुणे यांच्यावतीने यवतमाळ जिल्ह्याचा विकास अहवाल तयार करण्यात येत आहे. सप्टेंबर महिनाअखेर हा अहवाल विदर्भ विकास मंडळाला प्राप्त होईल.
शाळाबाह्य विद्यार्थी व गळतीच्या प्रमाणावर अभ्यास अहवाल
बालमजुरीमुक्त क्षेत्र घोषणेला साकार करण्यासाठी विदर्भातील शाळाबाह्य मुलांच्या यथास्थितीचा अभ्यास, शाळा नोंदीत नसलेल्या बालकांच्या स्थितीचा अभ्यास करून कार्यरत उपाययोजनांना अधिक परिणामकारक करण्यासाठीच्या अभ्यास प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली. हा अभ्यास अहवाल तयार करताना उपलब्ध असलेल्या शाळाबाह्य विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण याबाबत डॉ. किशोर मोघे यांनी सादर केलेल्या अहवालाला यावेळी मान्यता देण्यात आली.