वीज काेसळल्याने नागपूर जिल्ह्यात मच्छीमार बुडाला; एक जण वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 05:28 PM2021-09-20T17:28:51+5:302021-09-20T17:41:49+5:30
जलाशयात मासेमारी करताना जाेरात कडाडलेली वीज थेट मच्छीमारांच्या बाेटीजवळ काेसळली. यात बाेटीतील एक मच्छीमार बुडाला तर दुसरा सुदैवाने थाेडक्यात बचावला. ही घटना साेमवारी (दि. २०) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जलाशयात मासेमारी करताना जाेरात कडाडलेली वीज थेट मच्छीमारांच्या बाेटीजवळ काेसळली. यात बाेटीतील एक मच्छीमार बुडाला तर दुसरा सुदैवाने थाेडक्यात वाचला. हे दाेघेही सख्खे भाऊ हाेत. बुडालेल्या मच्छीमारास शाेधण्यात अद्याप यश आले नाही. ही घटना साेमवारी (दि. २०) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. जटाशंकर गणपत नागपुरे (४०) असे बुडालेल्या तर विष्णू गणपत नागपुरे (३०) असे बचावलेल्या मच्छीमाराचे नाव आहे. दाेघेही सख्खे भाऊ असून, रा. पंचाळा (बु.), ता. रामटेक येथील रहिवासी आहेत. ते नेहमीप्रमाणे साेमवारी सकाळी खिंडसी जलाशयात मासेमारी करायला गेले हाेते. बाेटीत बसून मासेमारी करीत असतानाच पावसाला सुरुवात झाली.
त्यातच जाेरात कडाडलेली वीज पाण्यात त्यांच्या बाेटीजवळ काेसळली. त्यामुळे जटाशंकर बेशुद्ध पडला तर विष्णू शुद्धीवर हाेता. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बाेटीसह दाेघेही बुडले. विष्णू शुद्धीवर असल्याने त्याने पाेहत जलाशयाचा किनारा गाठला आणि पाेलीस पाटील दिलीप भांडारकर यांना माहिती दिली. पुढे दिलीप भांडारकर यांनी रामटेक पाेलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून जलाशयात जटाशंकरचा शाेध घेणे सुरू केले.