माशांच्या प्रजननकाळात मासेमारांनी पाळला श्रावण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 08:14 AM2020-08-17T08:14:07+5:302020-08-17T08:14:34+5:30
एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे पावसाची रिपरिप यामुळे मासेमारी बहुतेक थांबली आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रावणाच्या काळात बहुतेकांचा मांसाहार बंद असतो. हा काळ तसा बहुतेक प्राणी आणि वनस्पतीसाठी महत्त्वाचा असतो. माशांसाठीही हा प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे या काळात मासेमारी होऊ नये, अशी अपेक्षा असते. या काळात मासेमारी करू नये असा नियमही आहे, पण गांभीर्याने त्याचे पालन होत नाही. यावर्षी मात्र एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे पावसाची रिपरिप यामुळे मासेमारी बहुतेक थांबली आहे.
श्रावणाचा काळ हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. जवळपास सर्वच प्रजातींची मासे या काळात अंडी आणि पिल्ले तयार करतात. त्यामुळे माशांची संख्या वाढण्यात मदत होते. म्हणून या काळात मासेमारी करू नये, अशी अपेक्षा असते. विशेष म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये या काळात मासेमारीबंदीचा कायदा आहे. शिवाय मुंबई, ठाणे, कोकण भागातही नियमानुसार मासेमारीला बंदी असते. महाराष्ट्रातही हा कायदा असल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्याबाबत हवी तशी जागृती नाही आहे. विदर्भात हा नियम पाळला जात नव्हता. यासाठी काही सामाजिक संघटनांनी मासेमार बांधवांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. यावर्षी हे प्रयत्न उपयोगी पडले असे दिसते.
मत्स्य व्यावसायिक प्रभाकर मांढरे यांनी सांगितले, या काळात मासेमारी होत नाही; पण यावर्षी ८० टक्के मासेमारी थांबली असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या काळात पाऊस अधिक असतो व त्यामुळे नद्या, तलाव भरलेले असतात. त्यामुळे मासेमार मासेमारी करीत नाही. भंडारा, चंद्रपूरमध्ये बहुतेक मत्स्यपालन सोसायट्या मासेमारी करीत नाही. त्यापेक्षा मत्स्यबीज टाकून मत्स्य वाढीचा प्रयत्न केला जातो. यावर्षी फिजिकल डिस्टन्सिंगमुळे मासेमारी करणे शक्यच नसल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले.
लहान मासेमारांचा नाईलाज आहे
प्रभाकर मांढरे यांनी मासेमारांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. मार्च ते जून महिना मासेमारीचा सुगीचा काळ असतो. मात्र यावर्षी संपूर्ण काळ लॉकडाऊनमध्ये गेला. त्यामुळे मासेमारांना हलाखीच्या परिस्थितीत जगावे लागत आहे. अशात लॉकडाऊनमधून सुटका मिळाल्यानंतर आपली गुजराण करण्यासाठी मासेमारी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे लहान तलाव आहेत ते आणि काही गरीब मासेमार मासे पकडून आपल्या कुटुंबाची गरज भागवत असल्याचे मांढरे यांनी सांगितले.