मासेमाऱ्यांना तलाव ठेक्याची रक्कम भरण्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 11:13 PM2021-05-17T23:13:18+5:302021-05-17T23:14:20+5:30
Fishermen worry मच्छीमार सहकारी संस्थांवर कोरोनामुळे विपरित परिणाम झाला. संचारबंदीमुळे मासेमारी बंद होती. अशात शासनाने तलाव ठेका रक्कम भरण्याचे आदेश मच्छीमार सहकारी संंस्थांना दिले आहे. त्यामुळे मासेमारांचे टेंशन वाढले आहे. शासनाने तलाव ठेका रक्कम माफ करावी, अथवा ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाचे संचालक प्रकाश लोणारे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मच्छीमार सहकारी संस्थांवर कोरोनामुळे विपरित परिणाम झाला. संचारबंदीमुळे मासेमारी बंद होती. अशात शासनाने तलाव ठेका रक्कम भरण्याचे आदेश मच्छीमार सहकारी संंस्थांना दिले आहे. त्यामुळे मासेमारांचे टेंशन वाढले आहे. शासनाने तलाव ठेका रक्कम माफ करावी, अथवा ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाचे संचालक प्रकाश लोणारे यांनी केली आहे.
जुलै ते सप्टेंबर, २०१९ या काळात अतिवृष्टीमुळे तलावात मत्सबीज संचयन केलेले वाहून गेले. त्यानंतर, मार्च, २०२० ते जून, २०२० मध्ये संचारबंदी लागल्याने मत्स्य उत्पादनावर विपरित परिणाम झाला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, २०२० या काळात अतिवृष्टीमुळे मासेमारांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी शासनाने तलाव ठेका रक्कम भरण्यास ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत मुदतवाढ दिली होती.
दुसऱ्या लाटेतही मासेमारीवर विपरित परिणाम झाला. या वर्षातील तलाव ठेका रक्कम ३० मेच्या आत भरायची आहे. ऑगस्टमध्ये पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने दोन वर्षांची तलाव ठेका रक्कम माफ करावी, गोड्या पाण्यातील मासेमाऱ्यांसाठी २०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लोणारे यांनी केली.