रागाच्या भरात चक्क कुत्र्याच्या पिल्लाला गच्चीवरून खाली फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:22+5:302021-06-16T04:11:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरी आणलेले कुत्र्याचे पिल्लू परत निघून जात नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने चक्क त्याला गच्चीवरूनच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरी आणलेले कुत्र्याचे पिल्लू परत निघून जात नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने चक्क त्याला गच्चीवरूनच खाली फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शहरातील पांढरपेशा वस्तीत ही घटना घडली असून माणुसकीला लाजविणारा हा प्रकार असल्याची संतापजनक भावना व्यक्त होत आहे. श्वानप्रेमींच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
स्नेहनगर येथील राहुल मेश्राम नामक एका व्यक्तीने मुलांना खेळण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचे कुत्र्याचे पिल्लू घरी आणले होते. दोन दिवस खेळून झाल्यावर कशाला हवी ही ब्याद असा विचार करून त्याला घराबाहेर सोडण्यात आले. मात्र मुलांचा लळा लागलेले ते पिल्लू परत घरी येत होते. राहुलने संतापाच्या भरात त्या पिल्लाला गच्चीवर बंद केले व काहीही खाण्यास दिले नाही. ऊन व पाऊस झेलताना भुकेमुळे निष्पाप पिल्लू ओरडू लागले होते. त्याच्या आवाजाने राहुलचा राग अनावर झाला व १३ जून रोजी चक्क गच्चीवरून त्याला कानाने पकडून खाली फेकले. सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनचे सदस्य मंदार चितळे यांना जवळील लोकांनी ही घटना सांगितली. वरून पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली असून शरीरात काही ठिकाणी फ्रॅक्चरदेखील झाले आहे. चितळे यांनी तत्काळ त्या पिल्लाला दवाखान्यात नेले. संस्थेच्या शेल्टरमध्ये त्या पिल्लावर उपचार सुरू असून ते प्रचंड धक्क्यात असल्याची माहिती संस्थापिका स्मिता मिरे यांनी दिली.
पोलिसांत तक्रार दाखल
यासंदर्भात मिरे यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल मेश्रामशीदेखील संपर्क केला. सुरुवातीला त्याने असे काही केल्याची बाब नाकारली. मात्र त्यानंतर असे केल्याचे मान्य केले. तसा व्हिडीओदेखील संस्थेच्या सदस्यांनी काढला. पोलिसांनी तक्रारीवर गुुन्हा दाखल केला नव्हता. संबंधित कृत्य अमानवीय असून अशा क्रूर मानसिकतेला आळा घालणे आवश्यक आहे. याअगोदरदेखील कुत्र्यांना जीवे मारण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. मात्र या घटनांना प्रशासनाकडून गंभीरतेने घेतले जात नाही. या प्रकरणात प्राणी क्रूरता अधिनियमाअंतर्गत कठोर कलमे लावावी व असे करण्याची कुणाची हिंमत व्हायला नको यासंदर्भात पोलिसांनी पावले उचलावीत, अशी भावना स्मिता मिरे यांनी व्यक्त केली.