पाच आरोपींना एक वर्ष कारावास
By admin | Published: October 22, 2016 02:51 AM2016-10-22T02:51:19+5:302016-10-22T02:51:19+5:30
तलावात विषयुक्त खाद्यपदार्थ टाकून जंगलातील पाणपक्ष्यांची शिकार केल्याचा प्रकार हिंगणा तालुक्यात २०१३ मध्ये घडला होता.
वनपक्ष्यांची शिकार : पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला
हिंगणा : तलावात विषयुक्त खाद्यपदार्थ टाकून जंगलातील पाणपक्ष्यांची शिकार केल्याचा प्रकार हिंगणा तालुक्यात २०१३ मध्ये घडला होता. याप्रकरणी सुनावणी होऊन पाच आरोपींना एक वर्ष कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
कैलास लहानु भांगे (४९), प्रमोद गजानन बागडे (४३), राजू किसन नागपुरे (४६), गजानन तुकाराम नागपुरे (४७) आणि देवनाथ अखाडू भांगे (४३) सर्व रा. रायपूर हिंगणा अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
३० डिसेंबर २०१३ रोजी आरोपींनी विषयुक्त खाद्यपदार्थ (पक्षी खाऊ शकेल असे) दहेगाव येथील तलावात टाकले. त्यामुळे १६ कुटपक्षी, बदक अशा एकूण २३ वन्य पक्ष्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास वन विभाग करीत असताना पक्ष्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले. त्यानंतर आरोपींनी रचलेला हा डाव लक्षात आला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरण हिंगणा येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले होते.
या प्रकरणावर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पी. पी. देशमुख यांनी पाचही आरोपींना एक वर्ष कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात वन विभागाने पुरावे गोळा करून बाजू मांडली. त्यामुळेच आरोपींना शिक्षा होऊ शकली. (प्रतिनिधी)