पाच एकरातील उसाच्या पिकाची राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:58+5:302021-09-19T04:08:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ठिणगी पडली आणि ताराखाली असलेल्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ठिणगी पडली आणि ताराखाली असलेल्या उसाच्या पाचाेळ्याने पेट घेतला. ही आग वेळीच लक्षात न आल्याने तसेच आग विझविण्यास विलंब झाल्याने आठ एकरातील उसाचे पीक जळून राख झाली. ही घटना परसाड (ता. कामठी) शिवारात शनिवारी (दि. १८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
माधुरी राजेश नरड (४०, रा. परसाड, ता. कामठी) यांची परसाड शिवारात शेती असून, त्यांनी पाच एकरात उसाच्या लागवड केली आहे. पिकाचा दर्जा उत्तम असल्याने चांगले उत्पन्न हाेणार असल्याची त्यांना आशा हाेती. त्यांच्या शेतातून सावळी-केम शिवाराच्या दिशेने उच्च दाबाची विजेची लाईन गेली आहे. या तारा काही ठिकाणी लाेंबकळलेल्या असून, जाेराच्या हवेमुळे त्या तारांचा एकमेकांना स्पर्श हाेताे.
दरम्यान, शनिवारी दुपारी हवेमुळे या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि ठिणगी पडली. या ठिणगीमुळे ताराखाली असलेल्या कचऱ्यासह उसाच्या पिकाने पेट घेतला. घटनेच्या वेळी शेतात कुणीही नव्हते. काही वेळाने माहिती हाेताच माधुरी नरड यांच्यासह नागरिकांनी शेत गाठले. ताेपर्यंत आगीने राैद्र रूप धारण केले हाेते. ही आग वेळीच विझविणे शक्य न झाल्याने पाचही एकरातील ऊस पूर्णपणे जळाला.
...
आठ लाख रुपयांचे नुकसान
या पाच एकरात किमान आठ लाख रुपयांचे उत्पन्न झाले असते. संपूर्ण ऊस जळाल्याने आठ लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती माधुरी नरड यांनी दिली. शेतातून गेलेल्या विजेच्या तारा लाेंबकळलेल्या आहेत. काही ठिकाणी विजेचे खांबही वाकले आहेत. या तारा व खांब सरळ करण्याची तसेच त्यांची याेग्य देखभाल व दुरुस्ती करण्याची महावितरणचे अधिकारी कधीच तसदी घेत नाही. त्यामुळे या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून महावितरण कंपनीने माधुरी नरड यांना आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
...
खांब वाकले, तारा लाेंबकळल्या
महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एन. वैद्य यांनी माहिती मिळताच घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तहसीलदार अक्षम पोयाम उपस्थित हाेते. त्यांना विजेचे खांब वाकले व तारा लाेंबकळल्या असल्याचे आढळून आले. या तारा कित्येक दिवसापासून लाेंबकळल्या असल्याचे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.