संघ-भाजप पदाधिकाऱ्यांची साडेपाच तास बैठक; फडणवीस, बावनकुळेंची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:15 AM2024-01-16T11:15:19+5:302024-01-16T11:42:37+5:30
या बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. रेशीमबाग येथील डाॅ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात झालेली ही बैठक साडेपाच तासांहून अधिक वेळ चालली. या बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या बैठकीला सुरूवात झाली. या बैठकीत अगोदर विदर्भातील संघटन विस्तार व नियोजनावर मंथन झाले. मागील वर्षात ठरविलेले उद्दिष्ट व त्यांची झालेली पूर्ती याचा आलेखदेखील मांडण्यात आला. त्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांशी साधण्यात येणारा जागांचा मेळ, संभाव्य प्रभावी उमेदवार याची माहिती भाजप नेत्यांकडून देण्यात आली.
केवळ लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणुकांत कोणत्या मतदारसंघात नवीन उमेदवार देता येतील, यावरदेखील त्यांनी प्रकाश टाकला, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला संघाकडून प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.