गणेशोत्सवासाठी साडेपाच हजार जवान तैनात; विसर्जनापर्यंत शहरात कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 02:03 PM2022-08-31T14:03:41+5:302022-08-31T14:04:53+5:30
अपराधी तत्त्वांवर विशेष ‘वॉच’
नागपूर : दोन वर्षांच्या कालावधीनंतर शहरात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून, शहर पोलीस दलाने सुरक्षाव्यवस्थेसाठी कंबर कसली आहे. गणेश चतुर्थीपासून ते विसर्जनापर्यंत शहरात कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. विविध ठिकाणी साडेपाच हजार पोलीस व होमगार्डचे जवान तैनात करण्यात आले असून, अपराधी तत्त्वांवर विशेष नजर ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सव बंदोबस्ताची माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आजपासून ९०० हून अधिक सार्वजनिक मंडळांनी परवानगी मागितली आहे. बुधवारी रात्रीपर्यंत संख्या वाढू शकते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापासूनच तयारी पूर्ण केली आहे. गणेशोत्सवासाठी पाचशेहून अधिक गुन्हेगार किंवा असामाजिक घटकांवर विशेष लक्ष राहणार असून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. बंदोबस्तात साडेचार हजार पोलीस कर्मचारी, तर ७०० पुरुष आणि ३०० महिला होमगार्ड तैनात राहणार आहेत. सोबतच एसआरपीच्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय आवश्यकतेनुसार अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात येईल.
जुन्या विसर्जनस्थळी बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावात चार फुटांच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. १४ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तेथेही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती स्थापन करणाऱ्या सार्वजनिक मंडळाकडून परवानगी देतानाच विसर्जनाच्या ठिकाणाची माहिती घेण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. या मूर्ती कोराडी, कन्हान किंवा इतर कोणत्याही नदीत विसर्जित केल्या जातील. मोठ्या मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करता येते. कोराडीमध्ये मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मोठा कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत शहर व ग्रामीण पोलीस कोराडी येथे संयुक्त आढावा घेऊन विसर्जनाचे नियोजन करणार आहेत.
मंडळांना सीसीटीव्ही लावण्याची सूचना
गणेश मंडळांना पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. यात गर्दीच्या नियंत्रणासाठी कार्यकर्त्यांची व्यवस्था, मूर्तीचे संरक्षण, महिलांसाठी विशेष व्यवस्था, वाहतूक कोंडी होणार नाही अशी व्यवस्था यांचा समावेश आहे. सोबतच कुणाकडूनही जबरदस्तीने वर्गणी मागू नये अशी सूचनादेखील करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘डीजे’ची ‘लिमिट’ रात्री दहापर्यंतच
ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेत राहून रात्री दहापर्यंतच डीजे वाजवता येईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या नियमावर पोलिसांची भूमिका 'झिरो टॉलरन्स'ची राहणार आहे. ३१ ऑगस्ट, ५ आणि ९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत डीजे वाजवण्यास सूट असेल. यादरम्यान वृद्ध, रुग्ण किंवा विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होणार नाही, याची काळजी मंडळांना घ्यायची आहे. ‘डीजे’ संचालकांची बैठक घेऊन पोलीस विभागाने त्यांना सूचना केल्या असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.