नागपूरचे पाच चिमुकले निघाले मुंबई पहायला... टीसीमुळे बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 10:43 AM2021-08-09T10:43:36+5:302021-08-09T10:44:22+5:30
Nagpur News मुंबईच्या आकर्षणापोटी पाच चिमुकल्यांनी बॅग भरून नागपूर रेल्वेस्थानक गाठले. ते रेल्वेस्थानकावर फिरत असताना एका टीसीने त्यांना बघितले आणि रेल्वे चाईल्डलाईनच्या स्वाधीन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईच्या आकर्षणापोटी पाच चिमुकल्यांनी बॅग भरून नागपूर रेल्वेस्थानक गाठले. ते रेल्वेस्थानकावर फिरत असताना एका टीसीने त्यांना बघितले आणि रेल्वे चाईल्डलाईनच्या स्वाधीन केले. यामुळे ही बालके असामाजिक तत्त्वांच्या हाती लागण्यापासून बचावली. परंतु रेल्वे चाईल्डलाईनचे प्रतिनिधी केवळ बूथमध्येच बसून राहात असल्यामुळे त्यांना ही बालके दिसली नाहीत. त्यामुळे रेल्वे चाईल्डलाईनचे काम काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर रविवारी दुपारी २.३० वाजता ५ ते १२ वर्ष वयोगटातील पाच मुले-मुली मुंबईला जाण्यासाठी बॅग भरून पोहोचली. ऑटोने ते रेल्वेस्थानकावर आले. रेल्वेस्थानकावर फिरत असताना एका टीसीची नजर त्यांच्यावर गेली. टीसीने रेल्वे चाईल्डलाईनकडे या बालकांना सोपविले. रेल्वे चाईल्डलाईनने या बालकांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. लोहमार्ग पोलिसांनी संबंधित बालकांच्या आईवडिलांना फोन करून संपर्क साधला. त्यांचे पालक आल्यानंतर कागदोपत्री कारवाई करून या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.