नागपुरातील कुख्यात अफरोजसह पाच गुन्हेगारांना २० वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:21 PM2018-10-23T22:21:09+5:302018-10-23T22:26:37+5:30
शिक्षक मुलीवर अमानवीय सामूहिक बलात्कार करणाऱ्या कुख्यात मोहम्मद अफरोज जियाऊद्दीन पठाण याच्यासह एकूण पाच गुन्हेगारांना नागपूर सत्र न्यायालयाने मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षक मुलीवर अमानवीय सामूहिक बलात्कार करणाऱ्या कुख्यात मोहम्मद अफरोज जियाऊद्दीन पठाण याच्यासह एकूण पाच गुन्हेगारांना नागपूर सत्र न्यायालयाने मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
अन्य आरोपींमध्ये अनिल राजू इंगळे, अश्विन अशोक दोनोडे, पुंडलिक डोमा भोयर व रोशन ऊर्फ आशिष मधुकर इंगळे यांचा समावेश आहे. सुदर्शन गजानन म्हैसकर या आरोपीला पुराव्यांअभावी सर्व गुन्ह्यांतून निर्दोष सोडण्यात आले. हे गुन्हेगार अफरोज टोळी म्हणून शहरात कुख्यात आहे. या टोळीने अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. सामूहिक बलात्काराची घटना १ डिसेंबर २०१४ रोजी रात्री कळमना पोलीस ठाण्यांतर्गत घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी २१ वर्षे वयाची होती. ती एका शाळेत शिकवायला जात होती. एक मुलगा तिचा जवळचा मित्र होता. ते नेहमी एकमेकांना भेटून गप्पात रंगून जात होते. घटनेच्या दिवशी ते स्वामीनारायण मंदिरात गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते रोडवर थांबून गप्पा करीत होते. रात्री ८ च्या सुमारास पाच आरोपी दोन दुचाकींनी तेथे आले. त्यांनी ते पोलीस असल्याचे सांगून मुलीची व तिच्या मित्राची विचारपूस सुरू केली. मुलीने ओळख विचारली असता आरोपींनी तिला धमकावले. त्यानंतर आरोपी हे मुलीला व तिच्या मित्राला वेगवेगळ्या दुचाकींवर बसवून सोबत घेऊन गेले. काही वेळाने आरोपींनी मुलीचा मित्र पळून गेल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीने घाबरून आरडाओरड सुरू केली. दरम्यान, आरोपींनी तिच्याच ओढणीने तिचे तोंड दाबून धरले. मुलीला निर्जन ठिकाणी नेल्यानंतर आरोपींनी चाकूने ठार मारण्याचा धाक दाखवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर मुलीला रोडवर आणून सोडून देण्यात आले. मुलीने घरी गेल्यानंतर वडिलांना सर्व हकीकत सांगितली. दुसºया दिवशी आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सत्र न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.
अशी आहे शिक्षा
- संबंधित पाच आरोपींना भादंविच्या कलम ३७६ (ड)अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास.
- मोहम्मद अफरोज, अनिल इंगळे व रोशन इंगळे यांना कलम ३६६ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ५०६ (२)अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास तर, कलम १७० अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास.