पाच कोटींच्या ठगबाजीचे प्रकरण : सतीश उके यांच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:28 AM2018-08-05T00:28:56+5:302018-08-05T00:30:06+5:30
मौजा बाभूळखेडा येथील पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना मुख्य न्यायदंडाधिकारी साळगांवकर यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मौजा बाभूळखेडा येथील पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना मुख्य न्यायदंडाधिकारी साळगांवकर यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेतला.
पोलीस लाईन टाकळी राठोड लॉनजवळील रहिवासी शोभाराणी राजेंद्र नलोडे (६०) यांच्या तक्रारीवरून ३१ जुलै २०१८ रोजी सतीश उके, चंद्रशेखर नामदेवराव मते आणि इतरांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४२३, ४२४, ४४७, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ कलमान्वये अजनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून उके यांना अटक करण्यात आली होती. त्यांचा ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला होता. पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपल्याने शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ल.श. वर्टीकर यांनी उके यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात दाखल ठगबाजीच्या गुन्ह्यांचा गोषवारा दाखल केला. हा आरोपी संपत्ती हडपण्याचे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. स्वत: वकील असल्याने त्यांना कायद्याची पळवाट माहीत आहे. तपास कामात आरोपी मदत करीत नसल्याने आणि आरोपीचे गुन्ह्यात सहभागी साथीदार अटक करणे आवश्यक असल्याने पोलीस कोठडी रिमांड वाढवून देण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली.
आरोपीच्या वकिलांकडून वाढीव पोलीस कोठडीस विरोध करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्यांचा जो गोषवारा सादर केला, त्यातील बऱ्याच गुन्ह्यात आरोपी दोषमुक्त झालेला आहे, असेही आरोपीच्या वकिलाकडून सांगण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली.
न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील रत्ना घाटे, आरोपीच्या वतीने अॅड. सुदीप जयस्वाल, अॅड. शशिभूषण वाहणे यांनी काम पाहिले.