नागपुरात अँटीक आर्टिकल व्यवसायात गुंतवणुकीच्या नावावर पाच कोटीने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:08 AM2019-10-26T00:08:02+5:302019-10-26T00:09:35+5:30
हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याला चित्रपटासाठी फायनान्स देण्याची बतावणी करून बोगस इंटरपोल अधिकारी आणि बिल्डर्सच्या टोळीने पाच कोटीने फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याला चित्रपटासाठी फायनान्स देण्याची बतावणी करून बोगस इंटरपोल अधिकारी आणि बिल्डर्सच्या टोळीने पाच कोटीने फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
आरोपीत शिवाजीनगर येथील रहिवासी केशव पडोळे, राजसिंह ऊर्फ राजेशकुमार तारकेश्वरसिंह रा. शततारका पॅलेस, झारखंड, आर. कृष्णकुमार रा. व्ही. एम. स्ट्रीट चेन्नई सह इतरांचा समावेश आहे. वडगाव पुणे येथील रहिवासी फिर्यादी विनित रामलालप्रसाद सिंह (४१) हे हिंदी चित्रपट तयार करण्याचे काम करतात. ऑगस्ट २०१० मध्ये विनित सिंह यांना चित्रपट बनविण्यासाठी मोठ्या फायनान्सची गरज होती. त्यासाठी त्यांनी आपल्या ओळखीचे अख्यकुमार शाहु ऊर्फ गुरुजी आणि विजय नायर यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या माध्यमातून विनित सिंह आणि त्यांचे मित्र विपुल शहा नागपुरात आले. ते केशव पडोळे यांच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात भेटले. विजय नायरने केशव पडोळे आणि राजेशकुमार सिंह यांची मोठ्या बिल्डरच्या रुपाने ओळख करून दिली होती. पडोळे यांना बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाचा चेअरमन असल्याचे सांगितले होते. पडोळे यांचे मोठे रिसॉर्ट असून सुपर अँटीक आर्टिकल खरेदीचा व्यवसाय असून भारत सरकारच्या विविध विभागात पुरवठ्याचे काम असल्याची माहिती दिली होती. राजेशकुमार सिंह हे सुपर अँटीक आर्टिकलचे विशेषज्ञ सांगून डिफेन्स आणि इंटरपोलचे अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी चित्रपटासाठी फायनान्सची आवश्यकता असल्याचे सांगून राजेशकुमार यांच्याशी भेट घेतली. त्यावर राजेशकुमार सिंह यांनी विनित सिंह यांना काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. राजेशकुमारने विनितला सांगितले की, त्यांचे सुपर अँटीक आर्टिकलनुसार जुन्या नाण्यातून इरिडीयम धातू काढण्याचे काम आहे. हा धातू अटॉमिक रिसर्च आणि स्पेस रिसर्चमध्ये वापरला जात असल्याची माहिती दिली. या व्यवसायात अँटीक वस्तूंच्या विक्रीत कोट्यवधी रुपये मिळत असल्याचा दावा केला. त्यामुळे चित्रपट निर्माता विनितला ५० ते १०० कोटी रुपये फायनान्स सहज देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यासाठी त्यांनी सांगितलेल्या शहरात आणि जागी ये-जा करण्यासाठी विनित सिंहला खर्च करण्याची मागणी केली.
त्यानंतर राजेशकुमार आणि इतर व्यक्ती विनित सिंहला २०१० ते २०१७ पर्यंत सुपर अँटीक आर्टिकलसाठी नागपूर, भुवनेश्वर, हैदराबाद, कोलकाता, हुबळी, खामगाव, महु, घोसी, गोरखपूर, ओडीशा, चेन्नई, काठमांडु, बनारस आदी ठिकाणी घेऊन गेले. तेथे प्रवास, हॉटेल आणि इतर खर्च त्यांना करायला लावला. याशिवाय अनेक नातेवाईकांच्या खात्यात रक्कम टाकण्यास सांगितले. या पद्धतीने त्यांनी फिर्यादीकडून ५ कोटी रुपये खर्च केले. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुख्य आरोपीला अटक
गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेच्या पथकाने मुख्य आरोपी राजेशकुमार तारकेश्वर सिंहला गुरुवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. अशा प्रकरणात फसवणूक झाली असल्यास आर्थिक शाखेत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, अशोक भोयर, कमलाकर पाटील यांनी केली.
सेमिनारच्या नावाने फसवणूक
आरोपी राजेशकुमार सिंहने एका दिव्यांग महिलेला याच पद्धतीने सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली खर्च करायला लावून मोठमोठे सेमिनार आयोजित केले. तेथे प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून त्यांचा विश्वास संपादन करीत नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गुंतवणुकीच्या नावाखाली मिळविले. पोलीस अशा प्रकरणांचा तपास करीत आहेत.