पाच कोटींचे अत्याधुनिक वाचनालय धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:19 AM2017-11-07T00:19:10+5:302017-11-07T00:19:56+5:30
गरजू व गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करता यावा, यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने उत्तर नागपुरातील लष्करीबाग येथे आवळेबाबू चौकात बाजीराव साखरे वाचनालयाची अत्याधुनिक वास्तू उभारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरजू व गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करता यावा, यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने उत्तर नागपुरातील लष्करीबाग येथे आवळेबाबू चौकात बाजीराव साखरे वाचनालयाची अत्याधुनिक वास्तू उभारली आहे. परंतु प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेल्या दोन वर्षांपासून पाच कोटींची ही इमारत पडून आहे.
२५१३.८० चौ.मीटर भूखंडावर वाचनालयाची आलिशान तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे. एकाचवेळी ३५० मुले व ३५० मुली अध्ययन करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करता यावी, यासाठी येथे अभ्यासाची स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र वर्गखाली व कॉन्फरन्स हॉल, लहान मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष, इतर परीक्षार्थींसाठी अध्ययन साहित्य, मार्गदर्शन केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. देखभालीसाठी ही वास्तू नासुप्र महापालिकेकडे हस्तांतरित करणार आहे.
विदर्भातील पहिली वातानुकूलित ई-लायब्ररी येथे सुरू केली जाणार आहे. बांधकाम पूर्ण झाले आहे. फर्निचरही बसविण्यात आले आहे. पण विद्यार्थी दोन वर्षांपासून उद्घाटनाची प्रतीक्षा करीत आहेत. तीन महिन्यांपूर्वी येथे महिनाभरात वाचनालय सुरू करण्यात येईल, असा फलक येथे लावण्यात आला आहे. परंतु अद्याप हा दिवस उजाडलेला नाही.
कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारण्यात आलेली वाचनालयाची इमारत वापराविना पडून असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
संगणक व पुस्तके उपलब्ध करण्याची गरज
बाजीराव साखरे वाचनालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. फर्निचर बसविण्यात आले आहे. पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. संगणक व पुस्तके उपलब्ध करण्यासाठी १.६ कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात येणार होता. मात्र अद्याप उपलब्ध झालेला नाही.
वाचनालय तातडीने सुरू करावे
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी, यासाठी शासनाच्या निधीतून बाजीराव वाचनालयाची इमारत उभारण्यात आली. फर्निचरही बसविण्यात आले आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून वाचनालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी वाचनालयाचे तातडीने उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक संदीप सहारे तसेच उत्तर नागपूर विकास आघाडीचे अनिल वासनिक यांनी केली आहे.
वाचनालय लवकरच सुरू करू
बाजीराव वाचनालय महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करू. मंगळवारी महापालिका आयुक्तांसोबत वाचनालयाला भेट देऊन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करू. विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी, यासाठी गरज भासल्यास महापालिकेतर्फे पुस्तके व संगणकासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल.
- संदीप जाधव,
अध्यक्ष,
स्थायी समिती महापालिका