वन विभागाची जमीन विकून पाच कोटी हडपले : कुख्यात शाहनवाज टोळीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 10:34 PM2021-06-11T22:34:50+5:302021-06-11T22:35:15+5:30
Fraud forest land selling , crime news कामठी येथील कुख्यात भूमाफिया शाहनवाज खान व इतर आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून गोरेवाडा येथील वन विभागाची जमीन विकली. त्याद्वारे आरोपींनी पाच कोटी रुपये हडपले. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने एकूण नऊ आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी येथील कुख्यात भूमाफिया शाहनवाज खान व इतर आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून गोरेवाडा येथील वन विभागाची जमीन विकली. त्याद्वारे आरोपींनी पाच कोटी रुपये हडपले. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने एकूण नऊ आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
इतर आरोपींमध्ये बिल्डर राजश्री अमरदीप कांबळे, तिची मुलगी मनीषा कांबळे, वासुदेव इंगोले, किरण समर्थ, संदीप सहदेव मेश्राम, आकाश भारद्वाज, राम किशोर रहांगडाले आदींचा समावेश आहे. शाहनवाज दीर्घ काळापासून जमीन घोटाळे करीत आहे. त्याने इतर आरोपींसोबत मिळून वन विभागाच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार केले व ती जमीन बिल्डर राजश्री कांबळेला विकली. राजश्रीने त्या जमिनीवर ले-आऊट टाकून त्यावरील भूखंड वर्षा भुरेसह ३४ नागरिकांना विकले. हा गैरप्रकार २०१८ पासून सुरू आहे. याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने संबंधित जमीन ताब्यात घेतली. त्यामुळे भूखंड खरेदी करणाऱ्या नागरिकांनी आरोपींना पैसे परत करण्याची मागणी केली. परंतु, कुणालाच पैसे देण्यात आले नाही. परिणामी, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली. त्यामुळे आरोपी फरार झाले आहेत. शाहनवाजचा हा अलिकडचा दुसरा गुन्हा होय. यापूर्वीच्या गुन्ह्यातही त्याला अद्याप अटक झाली नाही. दहशतीमुळे अनेकजण त्याच्याविरुद्ध तक्रार करीत नाही.
पोलीस कर्मचारीही फसले
या प्रकरणात पोलीस व वन कर्मचारीही फसले आहेत. ते अनेक महिन्यांपासून आरोपीच्या घराच्या फेऱ्या मारत आहेत. परंतु, त्यांना पैसे परत मिळाले नाही.