हिरवळीच्या नावाखाली नागपूर मनपाच्या तिजोरीत पाच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:27 PM2019-09-06T12:27:34+5:302019-09-06T12:29:40+5:30
राज्य सरकारकडून मनपाला ८२ हजार रोपटी लावण्याचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. हे उद्दिष्ट सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील वर्षात महानगरपालिकेने वृक्षकराच्या नावाखाली सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम गोळा केली आहे. या करामुळे नागरिकांना अधिकचा संपती कर भरावा लागत आहे. मात्र एवढी मोठी रक्कम कराच्या रूपाने वसूल करूनही महानगरपालिकेने एकही रोपटे शहरात लावले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एप्रिल २०१८ पासून संपती करासोबत वृक्षकराची एक टक्का आकारणी केली जात आहे. २०१८-१९ मध्ये संपती करात वृक्षकरातून ३ कोटी ४८ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम मिळाली. तर एप्रिल २०१९ ते जुलै २०१९ या काळात एक कोटी १५ लाख १७ हजार रुपये वसूल करण्यात आले; नंतर सप्टेंबरपर्यंतचे आकडे उपलब्ध नाहीत. मात्र पाच कोटींवर वसुली झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मनपाला ८२ हजार रोपटी लावण्याचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. हे उद्दिष्ट सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यानुसार मनपा कार्यालय परिसर, रोड साईड, मनपाचे मैदान, उद्यान, सार्वजनिक स्थळे आदी ठिकाणी ही रोपटी लावायची होती. यात कड़ूनिंब, काजू, जांभूळ, पिंपळ, सिसम, लेजेस्टोनिया आदींचा समावेश आहे. मात्र कुठेच या रोपट्यांचे रोपण झालेले नाही.
संपत्ती करामध्ये वृक्षकराची वसुली झाल्यावर ही रक्कम उद्यान विभागाकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे या रकमेतून वृक्षारोपण झालेले नाही. सध्या राज्य सरकारकडून मिळालेले ८२ हजार रोपटी लावण्याचे काम सुरू आहे.
- अमोल चौरपगारे, उद्यान अधीक्षक, मनपा
रोपटे पूर्णत: विकसित झाल्यावर त्याला वृक्ष म्हणता येईल. खरे तर ही रक्कम मार्च महिन्यातच उद्यान विभागाकडे जायला हवी होती. शहरतील वनराई वाढावी यासाठी सुरू असलेले वृक्षारोपणही नीटपणे व्हायला हवे.
- दुनेश्वर पेठे, नगरसेवक
विकासाच्या नावाखाली वृक्षतोड सुरू आहे. मात्र त्या बदल्यात किती वृक्ष लावले जात आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. शहरातील हिरवळ कमी व्हायला नको.
- कौस्तुभ चटर्जी