पाच दिवसीय ‘कॉम्पेक्स’चा समारोप

By admin | Published: February 9, 2016 02:49 AM2016-02-09T02:49:06+5:302016-02-09T02:49:06+5:30

पुढील वर्षी रौप्य महोत्सवी आयोजनाचे द्वार खुले करीत यंदाच्या २४ व्या ‘कॉम्पेक्स’चा समारोप सोमवारी उत्साहात झाला.

The five-day 'compex' concludes | पाच दिवसीय ‘कॉम्पेक्स’चा समारोप

पाच दिवसीय ‘कॉम्पेक्स’चा समारोप

Next

लाखापेक्षा जास्त लोकांची हजेरी : नामांकित कंपन्यांचे पॅव्हेलियन व स्टॉल
नागपूर : पुढील वर्षी रौप्य महोत्सवी आयोजनाचे द्वार खुले करीत यंदाच्या २४ व्या ‘कॉम्पेक्स’चा समारोप सोमवारी उत्साहात झाला. पाच दिवसांत लाखापेक्षा जास्त प्रेक्षक आणि ग्राहकांनी हजेरी लावली. समारोपीय समारंभात महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आयोजन विदर्भ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे (व्हीसीएमडीडब्ल्यूए) कस्तूरचंद पार्कवर ४ ते ८ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले. इन्टेक्स मुख्य प्रायोजक होते. यंदा ६५ पेक्षा जास्त स्टॉल आणि २५ पॅव्हेलियन होते. त्यात मिहान आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. या शासकीय कंपन्यांच्या स्टॉलसह इन्टेक्स, सॅमसंग, एचपी, डेल, लिनोव्हो, ब्रदर, कॅनॉन, इप्सॉन, मायक्रोसॉफ्ट, हाईकव्हिजन आणि आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचा समावेश होता.
‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे अध्यक्ष राजेश साबू, सचिव दिनेश नायडू, उपाध्यक्ष विनय धर्माधिकारी आणि रणजित उमाटे, प्रशांत बुलबुले यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यंदा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नागपूर नेक्स्ट’ नावाने स्पर्धा घेण्यात आली. त्यात नागपुरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून २७ प्रवेशिका आल्या. विद्यार्थ्यांनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रकल्पांचे सादरीकरण केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे राजेश गणोरकर यांनी परिश्रम घेतले. ईझीपॅक सॉफ्टवेअर इंकचे सीईओ अरुण सक्सेना आणि युनिलॉजिक सिस्टिम्स प्रा.लि.चे डॉ. उल्हास चांदेकर हे स्पर्धेचे निर्णायक होते. प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देण्यात आले. संस्थेने प्रदर्शकांची यादी, ले-आऊट प्लॅन, प्रदर्शित उत्पादने, डील, आॅफर, स्पर्धा आदींची माहिती देणारे अ‍ॅप दाखल केले. याचा फायदा ग्राहक, उत्पादक आणि विक्रेत्यांना होणार आहे. युवकांसाठी इन्टेक्स सेल्फी स्पर्धा अनोखी ठरली. पहिला पुरस्कार इन्टेक्स स्मार्टफोन आणि दुसरा पुरस्कार फीचर फोन होता. १०० इन्टेक्स बॅग आणि सेल्फी स्टीकचे वाटप करण्यात आले.
चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांची भेट
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दुपारी कॉम्पेक्स प्रदर्शनाला भेट देऊन स्टॉलधारकांशी संवाद साधला. प्रारंभी त्यांनी मिहान आणि मेट्रो रेल्वे या शासकीय डोमला भेट दिली. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘नागपूर नेक्स्ट’ पॅव्हेलियनला भेट देऊन प्रदर्शित प्रकल्पांची माहिती घेतली. नागपुरातील १२ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक २४ प्रकल्प प्रदर्शित केले होते. सर्व प्रकल्पाची त्यांनी प्रशंसा केली. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना एकाच छताखाली अद्ययावत वस्तू खरेदीची संधी असते.
आयोजन दरवर्षी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार अनिल सोले, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे यांच्यासह ‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे अध्यक्ष राजेश साबू, सचिव दिनेश नायडू, उपाध्यक्ष विनय धर्माधिकारी आणि रणजित उमाटे, प्रशांत बुलबुले आणि अन्य सदस्य उपस्थित होते. (वा. प्र.)

Web Title: The five-day 'compex' concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.