नागपूर मनपातही 'फाईव्ह डे वीक' : आयुक्तांनी काढले परिपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 08:57 PM2020-02-27T20:57:10+5:302020-02-27T20:58:05+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. त्यानुसार २९ फेब्रुवारीपासून महापालिकेत पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. त्यानुसार २९ फेब्रुवारीपासून महापालिकेत पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
पाच दिवसाचा आठवडा केल्याने मनपाच्या कार्यालयांची वेळ ४५ मिनिटांनी वाढविण्यात आली असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहणार आहे. कार्यालयीन वेळेत दुपारी १.३० ते २ या कालावधीत अर्ध्या तासाची भोजनाची सुटी गृहित धरण्यात आली आहे. मात्र महापालिका अखत्यारितील ज्या सेवा अत्यावश्क आहेत. त्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू राहणार नाही.
कर्मचारी संघटनेकडून स्वागत
राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनने आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मनपात पाच दिवसाचा आठवडा लागू करावा यासाठी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे व जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे, कार्याध्यक्ष विलास चहांदे व कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे आदींनी आयुक्तांना बुधवारी निवेदन दिले होते.