नागपुरात दोन दिवसात स्वाईन फ्लूचे पाच बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:32 PM2019-03-16T22:32:24+5:302019-03-16T22:33:15+5:30
‘स्वाईन फ्लू’बाबत सध्या सगळीकडे धोक्याची घंटा वाजवली जात आहे. एकीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन दिवसात पाच मृत्यूची नोंद झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. सध्या शहरात जानेवारी ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३ मृत्यू व १६९ रुग्ण आढळून आले आहे. धक्कादायक म्हणजे, पहिल्यांदाच सात वर्षीय मुलगा स्वाईन फ्लू ‘पॉझिटीव्ह’ आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘स्वाईन फ्लू’बाबत सध्या सगळीकडे धोक्याची घंटा वाजवली जात आहे. एकीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन दिवसात पाच मृत्यूची नोंद झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. सध्या शहरात जानेवारी ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३ मृत्यू व १६९ रुग्ण आढळून आले आहे. धक्कादायक म्हणजे, पहिल्यांदाच सात वर्षीय मुलगा स्वाईन फ्लू ‘पॉझिटीव्ह’ आला आहे.
तापमान वाढत असतानाही स्वाईन फ्लूचा जोर कमी झालेला नाही. दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यातच स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण दिसून आले होते. उपलब्ध माहितीनुसार, नागपूर विभागात जानेवारी ते १४ मार्च पर्यंत २२४ रुग्ण व १३ मृत्यूची नोंद होती. यात नागपूर शहरात रुग्णांची संख्या १५३ तर मृत्यूची संख्या ८ होती. परंतु दोन दिवसांत मृत्यूच्या संख्या ५ ने वाढली आहे तर रुग्णांची संख्या १६ ने वाढली आहे. मेडिकलमध्ये शनिवारी उपलब्ध झालेल्या स्वाईन फ्लूच्या अहवालात आणखी एक ३८ वर्षीय महिला पॉझिटीव्ह आली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना या रुग्णांच्या सेवेत असलेले मेयो, मेडिकल व महापालिकेचे बहुसंख्य डॉक्टरांसह, परिचारिका, कर्मचारी यांना अद्यापही स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस देण्यात आलेली नाही. उल्लेखनीय म्हणजे, मेडिकलमध्येच सहावर डॉक्टरांना स्वाईन फ्लूचे निदान झाल्याची माहिती आहे.
बालरोग विभागात सात वर्षीय रुग्ण
युवा व ज्येष्ठांमध्ये दिसून येणारा हा आजार आता मुलांमध्येही दिसून येऊ लागला आहे. मेडिकलच्या बालरोग विभागात नुकताच सात वर्षीय रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह आला. या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी सांगितले. सोबतच त्यांनी ताप, खोकला, सर्दी, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे किंवा दुखणे आणि थंडी भरुन येणे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखविण्याचे आवाहन केले आहे.