CoronaVirus in Nagpur : नागपुरात एकाच दिवशी पाच मृत्यू : तब्बल १२५ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:09 PM2020-07-17T23:09:01+5:302020-07-17T23:11:25+5:30
चार महिन्याच्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यात पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यातील तीन रुग्णांचा शासकीय रुग्णालयात तर दोन रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांची संख्या ४५ झाली आहे. शिवाय, आज तब्बल १२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार महिन्याच्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यात पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यातील तीन रुग्णांचा शासकीय रुग्णालयात तर दोन रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांची संख्या ४५ झाली आहे. शिवाय, आज तब्बल १२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील २३ रुग्ण ग्रामीणचे तर १०२ रुग्ण शहरातील आहेत. रुग्णांची एकूण संख्या २७७४ वर पोहचली आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेतील दोन तंत्रज्ञाना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली. यामुळे शुक्रवारी कोविड चाचणी बंद ठेवण्यात आली होती. जुलै महिन्यात आतापर्यंत कोविड पॉझिटिव्ह २१ रुग्णांचे बळी गेले आहेत. आज मृत्यू झालेल्यांमध्ये कामठी येथील ३४ वर्षीय पुरुष रुग्ण होता. या रुग्णाला १६ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता मेयो रुग्णालयात भरती केले होते. उपचार सुरू असताना आज दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. न्यूमोनिया असलेल्या या रुग्णाला इतर कुठलाही गंभीर आजार नव्हता. यामुळे डॉक्टरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरा मृत हा विनोबा भावे नगर येथील होता. ४८ वर्षीय या पुरुष रुग्णाला १२ जुलै रोजी मेयोत दाखल केले. या रुग्णालाही न्यूमोनिया व इतरही आजार होते. उपचार सुरू असताना दुपारी २.३० च्या सुमारास मृत्यू झाला. तिसरा मृत हा ७०वर्षीय पुरुष गोळीबार चौक परिसरातील होता. १४ जुलै रोजी मेयोत भरती करण्यात आले होते. या रुग्णालाही न्यूमोनिया, उच्चरक्तदाब व टाईप टू मधुमेह होता. उपचारादरम्यान आज ४.३० वाजता मृत्यू झाला. उत्तर अंबाझरी मार्गावरील एका खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच दोन कोविड रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यातील एक ६० वर्षीय पुरुष तर दुसरी ७१ वर्षीय महिला होती. आतापर्यंत मृत्यू झालेल्या एकूण मृृतांमध्ये २९ मृत्यू नागपूर जिल्ह्यातील असून १६ जिल्ह्याबाहेरील आहेत. अमरावती व अकोला येथे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा नागपुरात मृत्यू झाल्याने मेयो, मेडिकल व खासगीमध्ये मृत्यूची संख्या ४७ झाली आहे.
पाचपावली क्वारंटाईन सेंटरमधून २९ रुग्ण पॉझिटिव्ह
पाचपावली क्वारंटाईन सेंटरमधील संशयित रुग्णांची रॅपिड अॅण्टीजन चाचणी केली असता २९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. इतर ठिकाणावरील चार रुग्णही याच चाचणीने पॉझिटिव्ह आले. मेयोच्या प्रयोगशाळेत १९, मेडिकलच्या प्रयोगशाळेत १, एम्सच्या प्रयोगशाळेत २१, नीरीच्या प्रयोगशाळेत १८, माफसूच्या प्रयोगशाळेत ६, खासगी लॅबमधून १५, इतर प्रयोगशाळेतून १२ असे एकूण १२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज ७९ कोरोनाबाधित रुग्ण घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७३३ झाली आहे.
त्या तंत्रज्ञाचा हलगर्जीपणा नडला
मेडिकलच्या प्रयोगशाळेत कोविड संशयित रुग्णांचे नमुने हाताळणारा पुरुष व एक महिला तंत्रज्ञ सुरक्षेच्या साधनांचा योग्य वापर करीत नसल्याने ते पॉझिटिव्ह आल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. धक्कादायक म्हणजे, बाधित रुग्णाला मेडिकलमध्ये भरती केले असता तो स्वत:च प्रयोगशाळेत नमुने घेऊन गेल्याचे समजते. प्रयोगशाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून शनिवारी प्रयोगशाळा सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती आहे.
या वसाहतीतून आले पॉझिटिव्ह रुग्ण
शहरातील १०२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्यांमध्ये खामला २, बिनाकी मंगळवारी ९, मेहंदीबाग ३, भांडेप्लॉट १, श्यामनगर हुडकेश्वर १, काळे ले-आऊट १, नंदनवन जगनाडे चौक परिसर १, जरीपटका १, न्यू मंगळवारी १२, नाईक तलाव-बांगलादेश २, कोराडी रोड मानकापूर ३, ओमनगर शिवाजीनगर १, लकडगंज १, शांतिनगर १, निर्मल नगरी १, न्यू सुभेदार ले-आऊट १, किन्नर चौक १, उमंग कॉम्प्लेक्स सिव्हील लाईन्स १, सिव्हील लाईन्स १, पाचपावली गोंडपुरा १, शांती अपार्टमेंटमधील २ रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीणमध्ये २३ रुग्ण पॉझिटिव्ह
नागपूर ग्रामीणमधून कामठी येथील १२, काटोल येथील ८, उमरेड, कळमेश्वर व सावनेर तालुक्यात प्रत्येकी १ असे २३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. उमरेड तालुक्यात ११ महिन्याच्या चिमुकलीला संसर्ग झाला आहे.
संशयित : २७४९
बाधित रुग्ण : २७७४
घरी सोडलेले : १७३३
मृत्यू : ४५