उपराजधानीत कडाक्याच्या थंडीचे १२ तासात पाच बळी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:16 AM2018-01-29T10:16:34+5:302018-01-29T10:19:52+5:30
उपराजधानीत कडाक्याच्या थंडीने अवघ्या १२ तासात चार निराधारांचे बळी घेतले. मृत झालेल्या चारही वृद्धांची ओळख पटलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कडाक्याच्या थंडीने अवघ्या १२ तासात चार निराधारांचे बळी घेतले. मृत झालेल्या चारही वृद्धांची ओळख पटलेली नाही. एमआयडीसी, कळमना, तहसील आणि अजनी पोलीस ठाण्यात शनिवारी या घटनांची नोंद अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली, तर रविवारी सकाळी ताजबाग परिसरात एका वृद्धाचा मृतदेह आढळला.
शनिवारी पहाटे एमआयडीसीतील तकियावाले बाबा दर्ग्याजवळ सुमारे ८० वर्षांच्या वृद्धाचा मृतदेह आढळला. त्यानंतर सकाळी १० वाजताच्या सुमारास कळमन्यातील विद्यार्थी वसतिगृहाजवळ एक ६० वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळला. दुपारी ४ च्या सुमारास मेयोतील आकस्मिक तपासणी कक्षाजवळ एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर अजनी रेल्वेच्या आरक्षण कार्यालयाजवळ ७५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. हे चारही वृद्ध निराधार आणि अनोळखी आहेत. ते उघड्यावरच राहून मिळेल ते खात होते. हक्काचा निवारा नसल्याने आणि आप्तस्वकीय काळजी घ्यायला जवळ नसल्याने कडाक्याच्या थंडीत ते रात्र काढायचे. गेल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढल्याने या चारही जणांचा बळी गेला. त्याचप्रमाणे मोठा ताजबाग परिसरातील रहिवासी नारायण महादेवराव जगराळे (वय ६३) हे रविवारी सकाळी लहान ताजबाग परिसरात मृतावस्थेत आढळून आले. एमआयडीसी, कळमना, तहसील आणि अजनी तसेच सक्करदरा पोलिसांनी हे कडाक्याच्या थंडीचे बळी आहेत की नाही, ते स्पष्ट केले नाही. त्यांची पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.