नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून पाच लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:54 PM2019-03-23T22:54:12+5:302019-03-23T22:58:39+5:30
वेकोलित नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाकडून पाच लाख रुपये हडपणाऱ्या टोळीविरुद्ध शांतिनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेकोलित नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाकडून पाच लाख रुपये हडपणाऱ्या टोळीविरुद्ध शांतिनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कांता श्रावण माकडे, संदीप श्रावण माकडे (रा. मंगळवारी पेठ राममंदिर जवळ उमरेड), संतोष ओंकारनाथ शाहू (वय ४२, रा. वेकोलि वसाहत, उमरेड), अमरदीप रामराज पासवान (वय ५४, रा. वेकोलि वसाहत, उमरेड) आणि नितीन दामोदर दारुणकर (रा. कैलास अपार्टमेंट हुडकेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत.
नागराज चौक, शांतिनगर येथे राहणारे राहुल मधुकर रहाटे (वय ३१) यांना गेल्या वर्षी आरोपींनी गाठले. सावनेर वेकोलित मॅनेजमेंट कोट्यातून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना २० लाख, २० हजार, २२२ रुपयांची मागणी केली. लठ्ठ पगाराची पक्की नोकरी मिळणार असल्याामुळे हुरळून निघालेल्या राहुलने रक्कम देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार २६ आॅक्टोबर ते २१ डिसेंबर २०१८ या कालावधीत राहुलकडून उपरोक्त आरोपींनी पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर ते नोकरी लावून देण्यास टाळाटाळ करू लागले. त्यांनी विश्वासघात केल्याचे ध्यानात आल्याने राहुल आणि त्याच्या आईने आरोपींकडे आपल्या पाच लाखांसाठी तगादा लावला. परिणामी आरोपींनी २ लाख, ८० हजार रुपये परत केले आणि २ लाखांचा चेक लिहून दिला. त्यावेळी आरोपींनी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर राहुलच्या आईकडून ही रक्कम नोकरीसाठी नव्हे तर उधार घेतली होती, असे दबाव टाकून लिहून घेतले. दरम्यान, आरोपींनी दिलेला चेक बाऊन्स झाला. त्यामुळे राहुलने शांतिनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.