वृद्ध दाम्पत्याची पाच लाखांची रोकड लुटून चोरटे पसार; घटना सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 03:50 PM2022-03-04T15:50:52+5:302022-03-04T16:36:27+5:30
पाच लाखांची रोकड घेऊन त्यांची स्कुटी उभी असलेल्या ठिकाणी विश्वकर्मा दाम्पत्य आले अन् दुचाकी सुरू करण्याच्या तयारीत असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी विश्वकर्मा यांच्या हातातील पैशांची रोकड असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेतून पाच लाखांची रोकड काढून घराकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या एसआरपीएफच्या एका निवृत्त अधिकाऱ्याची पाच लाखांची रोकड दोन लुटारूंनी हिसकावून नेली. शिवप्रसाद विश्वकर्मा (वय ६३) असे त्यांचे नाव असून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
विश्वकर्मा हे राज्य राखीव दलातून एएसआय म्हणून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या निवृत्तीनंतरची रक्कम स्टेट बँकेच्या एमआयडीसी शाखेत जमा केली. आता घराचे बांधकाम आणि मुलीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी त्यांना पैशांची गरज असल्याने गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास ते पत्नी मीना शिवप्रसाद विश्वकर्मा (वय ६२) यांच्यासह बँकेत आले. २० मिनिटांनंतर बँकेतून पाच लाखांची रोकड घेऊन त्यांची स्कुटी उभी असलेल्या ठिकाणी विश्वकर्मा दाम्पत्य आले अन् दुचाकी सुरू करण्याच्या तयारीत असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी विश्वकर्मा यांच्या हातातील पैशांची रोकड असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली.
अचानक घडलेल्या या घटनेने विश्वकर्मा दाम्पत्य काही वेळेसाठी पुरते भांबावले. नंतर मात्र त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. बाजूची मंडळी धावून येईपर्यंत आरोपी सुसाट वेगाने पळून गेले. काही तरुणांनी त्यांचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते हाती लागले नाही. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. माहिती कळताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनीही तिकडे धाव घेतली.
आरोपी सीसीटीव्हीत कैद
मीना शिवप्रसाद विश्वकर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बँकेसह अन्य काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात आरोपी कैद झाले असून, त्याच आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.