राज्यात पाच लाखांवर ‘आरसी’ प्रलंबित

By admin | Published: July 25, 2016 02:36 AM2016-07-25T02:36:49+5:302016-07-25T02:36:49+5:30

राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अजब कारभार सुरू आहे. अन्य सेवांसाठी आॅनलाईन ....

Five lakhs of 'RC' pending in the state | राज्यात पाच लाखांवर ‘आरसी’ प्रलंबित

राज्यात पाच लाखांवर ‘आरसी’ प्रलंबित

Next

विदर्भात ८८ हजार : परिवहन विभागाचा भोंगळ कारभार
सुमेध वाघमारे नागपूर
राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अजब कारभार सुरू आहे. अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) कुठे सहा महिन्यांपासून तर कुठे गेल्या महिन्यापासून देणेच बंद झाले आहे. परिवहन विभागाने आरसीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदाचा पुरवठा थांबविल्याने राज्यभरात ५ लाख १३ हजार ५६१ आरसी प्रलंबित आहेत. यात एकट्या विदर्भात ८८ हजार, पुण्यात ६३ हजार, नाशिकमध्ये ५५ हजार तर ठाण्यात ५० हजार आरसी बुक कार्यालयातच पडून आहेत.

परिवहन विभागाने कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील ‘आरसी बूक’ला २००६मध्ये ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले. या ‘कार्ड’च्या पुरवठ्यासाठी ‘शाँग’ या खासगी कंपनीशी करार केला. जून २०१४ मध्ये कंपनीचे कंत्राट संपले. विभागाने कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली.
परंतु या दरम्यान नव्या कंपनीला कंत्राट किंवा या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. परिणामी, डिसेंबर २०१४ पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना जुन्या स्वरुपातील कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. आरटीओकडे आधीच कमी मनुष्यबळ यात या नव्या कामाची भर पडल्याने आणि वेळोवेळी आरसी कागदाचा (प्रि प्रिंटर स्टेशनरी) तुटवडा पडत राहिल्याने गेल्या वर्षी एक लाखावर प्रलंबित आरसीची संख्या गेली होती.
‘लोकमत’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली होती. गेल्या अधिवेशनात तारांकित प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. परंतु त्यानंतरही परिवहन विभाागकडून हालचाली झालेल्या नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाकडून जानेवारी २०१६ पासून या कागदाचा पुरवठाच झालाच नाही. परिणामी, ही संख्या राज्यात ५लाखांवर पोहचली आहे.
परिवहन विभागाच्या या भोंगळ कारभाराचा फटका वाहनधारकांना बसत आहे. वाहनांची आरसी मिळावी म्हणून रोज शेकडो वाहनधारक कार्यालयात खेटे घालत आहेत. सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

चंद्रपूर आरटीओमध्ये ३१,७०० आरसी प्रलंबित
विदर्भातील इतर आरटीओच्या तुलनेत चंद्रपूर आरटीओमध्ये सर्वाधिक, ३१ हजार ७०० आरसी प्रलंबित आहेत. गोंदिया आरटीओमध्ये १३ हजार, बुलडाणा आरटीओमध्ये १० हजार ५००, नागपूर शहर आरटीओमध्ये ६५, नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये ७ हजार ७५७ तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ५५०० असे ८८ हजार २५८ आरसी कार्यालयात प्रलंबित आहेत.

Web Title: Five lakhs of 'RC' pending in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.