वन अधिकाऱ्याच्या डिक्कीतून पाच लाख उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 07:25 PM2021-09-02T19:25:06+5:302021-09-02T19:25:34+5:30
Nagpur News वन विभागातील अधिकाऱ्याच्या बाइकच्या डिक्कीतून पाच लाख रुपये उडविल्याची घटना सदर पोलीस ठाण्याच्या परिसरात बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वन विभागातील अधिकाऱ्याच्या बाइकच्या डिक्कीतून पाच लाख रुपये उडविल्याची घटना सदर पोलीस ठाण्याच्या परिसरात बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. (Five lakhs were blown out of the forest officer's bike)
रमेश आदमने (५८), रा. एकतानगर, बोरगाव हे सेमिनरी हिल्स येथील वन विभागाच्या कार्यालयात राऊंड ऑफिसर आहेत. त्यांना एका मित्राने पाच लाख रुपये उसने मागितले होते. आदमने यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी बुधवारी दुपारी सीताबर्डी येथील खासगी बँकेतून पैसे काढले. पैसे बाइकला असलेल्या लेदरच्या डिक्कीत ठेवून ते सेमिनरी हिल्स येथील कार्यालयात पोहोचले. तेथे काही वेळ घालविल्यानंतर ते सिव्हिल लाइन्स येथील प्रशासकीय इमारत क्रमांक २ मध्ये आले. तेथे ओळखीची व्यक्ती भेटल्यामुळे ते चहाची ऑर्डर देण्यासाठी गेले. चहाची ऑर्डर देऊन परत आल्यानंतर त्यांनी डिक्की तपासली असता त्यात असलेले पाच लाख रुपये गायब झाल्याचे समजले.
त्यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बँकेतून पैसे काढल्यानंतर आदमने दोन-तीन ठिकाणी गेले. त्यामुळे पैसे कोठे चोरीला गेले याची पुष्टी होऊ शकली नाही. ज्या लेदरच्या डिक्कीत पैसे ठेवले होते त्या डिक्कीला केवळ चेन आहे. त्यामुळे पैसे उडविताना आरोपीला काहीच वेळ लागला नाही. अधिकाऱ्याने पाच लाख रुपये उसने देण्यासाठी काढल्यामुळे वन विभागात चर्चा सुरू आहे. सदर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
.............