तब्बल पाच महिन्यांनंतर ‘तिला’ आठवला स्वत:च्या घराचा पत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 08:30 PM2022-05-31T20:30:19+5:302022-05-31T20:32:30+5:30
Nagpur News पोलिसांना आढळलेल्या व स्मृतीभ्रंश झालेल्या महिलेला पाच महिन्यांनंतर आपल्या घराचा पत्ता आठवल्याने तिची व तिच्या कुटुंबियांची भेट होऊ शकली.
नागपूर : डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पोलिसांनी तिला अकोला मेडिकलमध्ये दाखल केले, परंतु प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहत तिला नागपूर मेडिकलमध्ये ‘रेफर’ केले. सलग तीन महिने उपचारानंतर ती शुद्धीवर आली. मात्र, घराचा पत्ताच ती विसरली होती. अखेर तिची रवानगी पुनर्वसन केंद्रात करण्यात आली. त्यात तिची आणखी सुधारणा झाली. तब्बल पाच महिन्यांनंतर तिला घरचा नेमका पत्ता आठवला. तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला. राजस्थानवरून तिला घेऊन जाण्यास आलेले नातेवाईक समोर पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
बुलडाणा येथील मलकापूर रेल्वे स्टेशन येथे ९ जानेवारी २०२२ रोजी ४८ वर्षीय अनोळखी महिला रेल्वेतून खाली पडली. तिच्या डोक्याला मार लागून गंभीररीत्या जखमी झाली. रेल्वे पोलिसांमार्फत तिला तातडीने १०० किलोमीटर अंतरावरील अकोला मेडिकलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती आणखी खालावली होती. तोंडातून रक्तही येत होते. यामुळे महिलेला नागपूरच्या मेडिकलमधील ट्रॉमा केअर सेंटर येथे पाठविण्यात आले. येथे आवश्यक उपचार सुरू झाले. रुग्ण मरणासन्न अवस्थेत होती. डॉक्टर व परिचारिका विशेष काळजी घेत होते. रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षकांमार्फत तिला आवश्यक औषधी व इतर साहित्य पुरवठा उपलब्ध करून दिला जात होता. हळूहळू उपचाराला प्रतिसाद देत ती शुद्धीवर आली. तुटत-तुटक ती बोलायला लागली. स्वत:चे नाव शीला अंबू (रा. परभणी) अशी माहिती देत होती. समाजसेवा विभागामार्फत व सेवा फाउंडेशनच्या सहायाने परभणी पोलिसांशी संपर्क साधला, परंतु तो चुकीचा पत्ता निघाला.
-उपचारानंतर सामाजिक संस्थेत पुनर्वसन
ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तीन महिने उपचारानंतर आणि तिचा पत्ताही मिळत नसल्याने तिचे पुनर्वसन अल्का मुंगुले यांच्या मदतीने राणी लक्ष्मीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेत करण्यात आले. त्यात तिची आणखी सुधारणा झाली. तिला अजून माहिती आठवत गेली आणि एक दिवस तिने राजस्थान येथील अलवार जिह्यातील एका खेडेगावातील पत्त्याची माहिती दिली. तेथे संपर्क साधण्यात आला. तिला पती, तीन मुली, एक मुलगा आणि इतर जवळचा मोठा गोतावळा असल्याचे कळले. सोमवारी तिचे नातेवाईक तिला घेऊन जाण्यासाठी आले. नातेवाइकांना समोर पाहताच तिला रडूच कोसळले. त्यांनी मेडिकलच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे व सामाजिक संस्थेचे आभार मानले.
-मानसिक आजारामुळे ती घरून निघाली
तिच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, शीलाची मानसिक स्थिती बरी नव्हती. तिच्यावर उपचार सुरू होते. २ जानेवारी रोजी ती अचानक घरून निघून गेली. बराच शोध घेतल्यानंतरही ती कुठेच सापडली नव्हती.