शिक्षक घोटाळ्यात आणखी पाच तक्रारी, चौकशीत समोर आली अधिकाऱ्यांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:38 IST2025-04-17T18:37:43+5:302025-04-17T18:38:42+5:30

उपसंचालक कार्यालयातून आणखी फायली जप्त : पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी

Five more complaints in teacher scam, names of officials revealed in investigation | शिक्षक घोटाळ्यात आणखी पाच तक्रारी, चौकशीत समोर आली अधिकाऱ्यांची नावे

Five more complaints in teacher scam, names of officials revealed in investigation

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
बनावट कागदपत्रांआधारे मुख्याध्यापकाला मंजुरी दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण वर्तुळातच खळबळ उडाली आहे. सदर पोलिस ठाण्यातच विविध प्रकारच्या पाच तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे अटकेत असलेले पाचही अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असून, त्यात काही अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेल्या पाचही आरोपींची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.


पोलिसांनी बुधवारी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, अधीक्षक नीलेश मेश्राम, मुख्याध्यापक पराग पुडके, उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक संजय दुधाळकर व वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना न्यायालयापुढे हजर केले होते. पोलिसांनी आणखी चौकशीसाठी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्याला नकार देत सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.


दरम्यान, पोलिसांनी बुधवारपर्यंत पाचही आरोपींची कसून चौकशी केली. मेश्राम, पुडके, दुधाळकर यांच्या चौकशीतून काही अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. आता त्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी सद्यःस्थितीत अधिकृतपणे ही नावे जाहीर केलेली नाहीत.


जप्त फायलींमध्ये कच्चा चिठ्ठा ?

  • सदर पोलिसांनी मंगळवारी दुपारी धंतोलीतील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची झाडाझडती घेतली असता मुख्याध्यापक पुडकेने पाठविलेला प्रस्ताव पोलिसांच्या हाती लागला होता.
  • यासोबतच पोलिसांना काही विशिष्ट फायलीदेखील सापडल्या आहेत. त्या फायलींचा अभ्यास सुरू आहे. त्यातून या प्रकरणातील अनेक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


'त्या' तक्रारींचीदेखील चौकशी होणार
दरम्यान, सदर पोलिस ठाण्यात माजी उपसंचालक वैशाली जामदार यांच्याविरोधात तक्रार आली होती. यासोबतच पोलिसांकडे अशाच प्रकारच्या गैरप्रकारांसंदर्भात एकूण पाच तक्रारी आल्या आहेत. यात कुही, वरूड येथील तक्रारींचादेखील समावेश आहे. सद्यःस्थितीत पोलिसांचा भर हा पुडकेविरोधात दाखल गुन्ह्याच्या चौकशीवर आहे. इतर तक्रारींची लवकरच चौकशी सुरू होईल. त्यामुळे शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला आहे.


उल्हास नरड मागताहेत जामीन

  • शिक्षक पद भरती घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायाधीश एस. एच. उके यांनी बुधवारी राज्य सरकारला नोटीस जारी करून यावर गुरुवारी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
  • नरड यांच्याविरुद्ध सदर पोलिसांनी पेंटिंग ठेकेदार मुन्ना वाघमारे यांच्या तक्रारीवरून ११ एप्रिल रोजी एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना १२ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. या गुन्ह्यात फसविण्यात आले, असा दावा त्यांनी अर्जात केला आहे. नरडतर्फे अॅड. अनिल ढवस यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Five more complaints in teacher scam, names of officials revealed in investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.