नागपुरात आणखी पाच उड्डाणपूल होणार, ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी; पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरला जोडणार
By योगेश पांडे | Published: October 29, 2023 10:30 PM2023-10-29T22:30:32+5:302023-10-29T22:30:45+5:30
पूर्व नागपूरचे आ.कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या पाच उड्डाणपुलांबाबत अनेक काळापासून मागणी होती.
नागपूर : उपराजधानीत आणखी पाच उड्डाणपूल तयार होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. राज्य शासनाने शहरातील पाच उड्डाणपुलांसाठी ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून या उड्डाणपुलांच्या माध्यमातून पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरला जोडण्यात येणार आहे. यामुळे या भागांमधील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे.
पूर्व नागपूरचे आ.कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या पाच उड्डाणपुलांबाबत अनेक काळापासून मागणी होती. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरदेखील मागणी करण्यात आली आहे. महारेलतर्फे उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव दोन्ही नेत्यांसमोर मांडण्यात आला. १२ जून रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीदरम्यान या उड्डाणपुलांना मान्यता देण्यात आली होती. राज्य शासनाकडूनदेखील या प्रकल्पासाठी ७९२ कोटींंच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असून महारेल कंपनीचे एमडी राजेशकुमार जैस्वाल यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
या मार्गांवर होणार उड्डाणपूल
- रेशीमबाग ते के.डी.के. कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडेप्लॉट – २५१ कोटी- चंद्रशेखर आझाद चौक- गंगाजमुना ते मारवाडी चौक – ६६ कोटी
- लकडगंज पो.स्टे. ते वर्धमाननगर – १३५ कोटी
- नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक – ६६ कोटी
- वर्धमाननगर ते निर्मलनगरी उमरेड रोड – २७४ कोटी
वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण
ज्या मार्गावर सध्या पाच उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत, तेथे सातत्याने रहदारी असते व वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण होतात. विशेषत: रेशीमबाग ते केडीके कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडेप्लॉट, चंद्रशेखर आझाद चौक, वर्धमाननगर इत्यादी भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी असते. उड्डाणपुलांचे काम सुरू झाल्यावर त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींनी आग्रह धरायला हवा, अशी नागरिकांची भावना आहे.