नागपूर विभागात स्वाईन फ्लूमध्ये आणखी पाच रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:47 PM2019-02-12T23:47:33+5:302019-02-12T23:49:19+5:30
स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. विशेषत: शहरात दोन दिवसात पाच रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या नागपूर विभागात रुग्णांची संख्या ८५, तर शहरात ५४ ची नोंद झाली आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात २६ रुग्ण आढळून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. विशेषत: शहरात दोन दिवसात पाच रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या नागपूर विभागात रुग्णांची संख्या ८५, तर शहरात ५४ ची नोंद झाली आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात २६ रुग्ण आढळून आले आहेत.
शहरात रात्री थंडी व दिवसा कडक उन्ह असे वातावरण आहे. याचा परिणाम शरीरावर होत आहे. सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांत वाढ झाली आहे. स्वाईन फ्लूची अशीच लक्षणे असल्याने घराघरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागपूर विभागात रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूची संख्या स्थिर आहे.
नागपूरनंतर अमरावतीत सर्वाधिक रुग्ण
नागपूरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली आहे. येथे १३ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहे. या शिवाय, वर्धेत दोन, गोंदियात दोन, भंडाऱ्यात एक, गडचिरोलीत एक, अकोल्यात एक रुग्ण आहे. तर राज्याबाहेरील परंतु नागपुरात उपचार घेत असलेले मध्य प्रदेश येथील सात तर पश्चिम बंगाल येथील एक रुग्ण असे मिळून ८५ रुग्णांची नोंद झाली आहे.
सात रुग्णांवर उपचार
जानेवारी ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे सात बळी गेले आहेत. यात शहरातील तीन, नागपूर ग्रामीणमधील एक, भंडाऱ्यातील एक व अमरावतील दोन रुग्णांचा समावेश आहे. सध्याच्या स्थितीत खासगी रुग्णालयात सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची पकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.