नागपूर जिल्ह्यात पाच नव्या नगर पंचायत व नगर परिषद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:17 PM2019-08-26T12:17:26+5:302019-08-26T12:18:53+5:30
पुनर्वसनामुळे जिल्ह्यातील काही गावांच्या भौगलिक रचनेमध्ये बदल होत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र व नव्या ग्रामपंचायती तयार होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी काळात जिल्ह्यातील बेसा-बेलतरोडी आणि पिपळा-बहादुरा या मोठ्या नगर परिषदा निर्मितीचे प्रस्ताव शासनाच्या नगररचना विभागाला जिल्हा परिषदेने पाठविले आहे़ तसेच कोंढाळी, नीलडोह, खापरखेडा या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदांमध्ये करावे, अशा मागणीचा प्रस्ताव पूर्वीच शासनदरबारी पडून आहे़ त्यावर अद्यापही निर्णय झाला नसला तरी, जिल्ह्यात नव्या नगर पंचायत व नगर परिषदेत वाढ होण्याचे संकेत आहे.
जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत नगर परिषद आणि नगर पंचायतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यापाठोपाठ ग्रामपंचायतीतही वाढ होत आहे़ मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या आता ७६८ होती़ त्यात एका ग्रामपंचायतीची वाढ होऊन ती संख्या आता ७६९ इतकी झाली़ कुही तालुक्यात हरदोली ग्रामपंचायतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे़ तसेच पुनर्वसनामुळे जिल्ह्यातील काही गावांच्या भौगलिक रचनेमध्ये बदल होत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र व नव्या ग्रामपंचायती तयार होत आहे़
भिवापूर तालुक्यातील मोखेबर्डीचाही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने तिची मंजुरी आल्यास ग्रामपंचायतीचा आकडा या वर्षातच ७७० होईल़ तसेच पिपळा-बहादुरा, बेसा-बेलतरोडी, नीलडोह, खापरखेडा या मोठ्या ग्रामपंचायती जिल्हा परिषदांच्या हातातून निसटून गेल्यास त्यांना महसुलावर पाणी सोडावे लागण्याची वेळ येणार आहे़ त्याचा थेट फटका शेष फंडाच्या तिजोरीला बसणार आहे़