नव्या नऊ पैकी पाच मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता पद विदर्भाकडे
By सुमेध वाघमार | Published: August 2, 2023 11:20 AM2023-08-02T11:20:50+5:302023-08-02T11:22:40+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालये घेण्यात ताब्यात : मान्यतेसाठी ‘एनएमसी’कडे करणार अर्ज
सुमेध वाघमारे
नागपूर : राज्यात होऊ घातलेल्या नऊ पैकी पाच मेडिकल कॉलेजवर अधिष्ठाता म्हणून विदर्भातील पाच वरिष्ठ डॉक्टरांची वर्णी लागली आहे. या कॉलेजच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा असणार आहे. शासनाने त्यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाची व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची परवानगी मिळविण्यापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालये ताब्यात घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याला परवानगी देण्यात आली. कॉलेज आणि रुग्णालय उभारणीसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग कामाला लागल्याचे दिसून येत आहे. दि. १ ऑगस्ट रोजी या नऊही कॉलेजवर अतिरिक्त अधिष्ठाता नेमून त्यांच्याकडे कामाची जबाबदारीही सोपविली आहे.
असे आहेत नवीन अधिष्ठाता
ठाणे अंबरनाथ कॉलेजवर मुंबई मेडिकल कॉलेजच्या डॉ. अश्विनी जाधव, पालघर कॉलेजवर मुंबईतील डॉ. दीपक जोशी, जालना कॉलेजवर छत्रपती संभाजीनगर मेडिकल कॉलेजचे डॉ. सुधीर चौधरी, बुलढाणा कॉलेजवर जळगाव मेडिकल कॉलेजचे डॉ. वैभव सोनार, वाशिम कॉलेजवर अकोल्यातील डॉ. गजानन आत्राम, भंडारा कॉलेजवर गोंदियातील डॉ. अभय हातेकर, गडचिरोली कॉलेजवर चंद्रपूरमधील डॉ. अविनाश टेकाळे, अमरावती कॉलेजवर यवतमाळमधील डॉ. अनिल बात्रा यांची, तर वर्धा कॉलेजवर नागपूर मेडिकल काॅलेजचे डॉ. एन. वाय. कामडी यांच्याकडे अतिरिक्त अधिष्ठातापदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
‘एमबीबीएस’च्या ९०० जागा वाढणार
सध्या राज्यात २३ मेडिकल कॉलेज असून, त्यांच्या प्रवेशक्षमता ३ हजार ७५० विद्यार्थी इतकी आहे. यात आता या नऊ कॉलेजची भर पडणार असल्याने प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेनुसार ९०० ‘एमबीबीएस’च्या जागा वाढणार आहेत. या कॉलेजशी संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय असणार आहे.